शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाच्या कार्यकाळात मुळगावी परतलेली किंवा कामाच्या निमित्ताने इतरत्र स्थलांतरित झालेल्या लाखो कामगारांची विशेषतः पह...
शिराळा / प्रतिनिधी : कोरोनाच्या कार्यकाळात मुळगावी परतलेली किंवा कामाच्या निमित्ताने इतरत्र स्थलांतरित झालेल्या लाखो कामगारांची विशेषतः पहिली ते आठवीची मुले शाळा आठ-नऊ महिन्यांपासून बंद असल्याने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत. त्यांचा अजुनही शाळांमध्ये प्रवेश घेतला नाही. किंबहुना काही ठिकाणी झाला असल्यास ती ऑनलाईन पध्दतीच्या शिक्षण प्रवाहातून नक्कीच बाहेर असल्याने त्याचे पडसाद बहुतांश शाळांच्या पट संख्येवरही होऊ लागले आहेत.
कोरोनाच्या संकट कार्यकाळात शहरातून, जिल्हातून, राज्यातून लाखो कामगारांचे कुटुंबासह मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे विद्यार्थी शाळांमध्ये दाखलपात्र आहेत की, नाहीत याचे उत्तर अनुत्तरीतच आहे. शासन दफ्तरी तशी कोणतीच नोंद नाही. गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून विद्यार्थी शाळाबाह्य असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
स्थलांतरित होऊन मुळगावी किंवा बाहेरगावी परतलेल्या कामगारांच्या मुलांचे अद्याप शाळा प्रवेशच झाले नाहीत. ही मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यासह तालुक्यात, तालुक्यातील खेडोपाडी ऊसतोडणी कामगारांची मुले त्यांच्या सोबत आहेत. अशावेळी या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या शाळा प्रवेशासाठी प्रयत्न होणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात जवळपास 11 हजारांहुन जास्त खाणी आहेत. दहा-पंधरा लाखांहून अधिक कामगार काम करतात. कामगारांची 0 ते 18 वर्षे वयोगटातील जवळपास पाच ते दहा लाख मुले आहेत. जवळपास साठ ते सत्तर टक्के दगडखाण कामगार आहेत.