मोदी यांचे प्रशंसोद्गार; विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव नवीदिल्लीः अलिगढ मुस्लिम विद्यापीठांच्या भिंतीवर देशाचा इतिहास आहे. येथे शिक्षण घेतल...
मोदी यांचे प्रशंसोद्गार; विद्यापीठाचा शताब्दी महोत्सव
नवीदिल्लीः अलिगढ मुस्लिम विद्यापीठांच्या भिंतीवर देशाचा इतिहास आहे. येथे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी जगभरात भारताचे नाव प्रकाशमान केले, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
या विद्यापीठाच्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. मोदी यांनी विद्यापीठात शिकणार्या विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले. मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले, की अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या भिंतीवर देशाचा इतिहास कोरला गेला आहे. विद्यापीठात शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या अनेक वेळा परदेशात भेटी झाल्या. ते नेहमी हास्य विनोद आणि शेरो शायरीमध्ये रममाण होतात. ते अभिमानाने सांगतात, की आम्ही अलिगढ मुस्लिम विद्यापीठात शिकलो आहोत. हे विद्यापीठ भारताचा अमूल्य ठेवा आहे. या इमारतीशी शैक्षणिक इतिहास जोडला गेलेला आहे.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आपल्याला पत्र लिहिले होते. कोरोना लसींच्या संशोधनासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली होती. अलिगढ मुस्लिम विद्यापीठ म्हणजे एक मिनी इंडिया आहे. इथे उर्दू, हिंदी, अरबी, संस्कृत शिकवली जाते. ग्रंथालयात कुराण आहे. त्याचबरोबर अनुवादीत केलेले गीता रामायणही आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठात एक भारत, श्रेष्ठ भारताची चांगली प्रतिमा आहे. इथे इस्लामविषयी जे संशोधन केले जाते, त्यामुळे भारताचे इस्लामिक देशांशी संबंध अधिक दृढ झाले आहेत, असे मोदी म्हणाले.
राजकारणापेक्षा समाज मोठा
समाजात वैचारिक मतभेद असतात; पण जेव्हा उद्देश राष्ट्रासमोर लक्ष्य प्राप्तीचा असतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून द्यायला हवेत. देशात कुणी कोणत्याही जाती वा धर्मातील असो, प्रत्येकाने देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान द्यायला हवे. या विद्यापीठात शिकलेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी विचारांना बाजूला ठेवून देशाच्या स्वातंत्र्यात योगदान दिले. राजकारण समाजाचा भाग आहे; पण राजकारण व सत्ता यापेक्षा देशातील समाज वेगळा असतो, असे मोदी यांनी सांगितले.