ठेचा झुणका-भाकरीचा घेतला आस्वाद.. पाटण / प्रतिनिधी : सह्याद्रीच्या जंगल दरी-खोर्यात वसलेल्या गडकिल्ल्यांच्या रांगेत इतिहासाची साक्ष देत उ...
ठेचा झुणका-भाकरीचा घेतला आस्वाद..
पाटण / प्रतिनिधी : सह्याद्रीच्या जंगल दरी-खोर्यात वसलेल्या गडकिल्ल्यांच्या रांगेत इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या पाटण जवळील सुंदरगडावर (दातेगड) दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढतच चालली असून कोयना पर्यटन परिक्षेत्रातील सुंदरगड हा पर्यटकांचे मुख्य आकर्षण झाले आहे.
येथील इतिहासिक ठेव्या बरोबर गड परिसरातील नैसर्गिक सौंदर्य पाहाताना पर्यटक पुन्हा येथे येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. याबरोबर येथील तिर्थक्षेत्र धारेश्र्वर दिवशी, वनकुसवडे पठार त्यावरील वीजनिर्मितीचा पवनचक्की प्रकल्प, काठी येथील सह्याद्रीच्या जंगल दरी-खोर्यात विस्तृरलेले कोयना धरणाच्या पाठीमागील शिवसागर जलाशय आणि त्यावरील सायंकाळचा मनमोहक सूर्यास्त पहाताना पृथ्वीवरील स्वर्ग सुखाचा आनंद या परिसरात मिळत असल्याची भावना अनेक पर्यटकांनी बोलून दाखविले. सुंदरगड संवर्धन समिती व साद सह्याद्रीची या टिमने एक दिवसाची पर्यटन सफर पर्यटकांना घडवून आणली या सफरीत कोयना पर्यटन परिसरातील पर्यटन स्थळांचा मनमुराद आनंद लुटला.
रविवारी सकाळी 9 वा. या सफरीला पाटणमधून सुरवात झाली. सुंदरगडाच्या पायथ्याला गेल्यानंतर खंजीर दरवाजा मार्गाने गड चडत असताना थोडासा जंगल ट्रॅकींगचा मिळालेल्या अनुभवात मार्गात विविध प्रकारची आढळणार्या जंगली वनस्पतींची विस्तृत माहिती एसटीआर गाईड सुशांत शिंदे यांनी पर्यटकांना दिली. गडाच्या खंजीर दरवाजात आसणार्या गणपती व वीर हनुमान मंदिरात शिवप्रेमी मनोहर यादव यांनी सर्व पर्यटकांचे स्वागत करुण गडाविषयी इतिहासीक माहिती पर्यटकांना देताना सुंदरगड संवर्धन समिती मार्फत गडावर वर्षभर राबविण्यात येणार्या उपक्रमाविषयी सांगितले. किल्ल्यावरील तलवार विहीर, यामधील सुंदरेश्वराचे दर्शन, आजूबाजूला असणार्या ऐतिहासिक खणाखुना पर्यटकांनी जवळून पाहिल्या.
गडउतार झाल्यानंतर साद सह्याद्रीची ही सफर थेट सह्याद्रीच्या दिवशी डोंगरात असलेल्या तिर्थक्षेत्र धारेश्वर गुंफेत पोहचली. येथे धारेश्वर अधिमठ मठाधिपती निळकंठेश्वर महाराज यांनी पर्यटकांचे स्वागत करून गुंफेविषयी असणारी ऐतिहासिक व धार्मिक माहिती पर्यटकांना दिली. यानंतर पुढील सफरीसाठी जाताना वाटेत दुपारच्या वेळेत निसर्गाच्या सान्निध्यात गरम-गरम भाकरी, झुणका, ठेचा, कांदा-लिंबू अशा जेवणाचा आस्वाद पर्यटकांनी घेतला. दुपारच्या न्ह्यारीनंतर हि सफर थेट काठी येथील केटू पॉइंटकडे मार्गस्थ झाली. जाता-जाता वाटेत विजनिर्मीतीचा पवनचक्की प्रकल्प पर्यटकांनी पाहिला. याठिकाणी येथील अभियंता महेश पवार यांनी पवनचक्की विषयी विस्तृत माहिती पर्यटकांना दिली. सायंकाळी सुर्यास्त समयी ही सफर केटू पॉइंट काठी अवसरी येथे पोहचली. याठिकाणी कोयना धरणाचा विस्तृत शिवसागर जलाशय, कोयना अभयारण्याचे सह्याद्रीच्या माथ्यावर विस्तुरलेले अफाट जंगल यांच्या साक्षीने ढगाआडून लाल, नारंगी, गुलाबी निळ्या अशा रंगाच्या मिलनात डोंगराआड गेलेला सुर्य पाहताना पृथ्वीवरील स्वर्ग सुखाचा आनंद.. सायंकाळचा सुर्यास्त देऊन गेला.
साद सह्याद्रीची हि पर्यटन सफर घडवून आणन्यासाठी सुंदरगड संवर्धन समितीचे मावळे लक्ष्मण चव्हाण, शंकर मोहिते, अमर जाधवराव, हरी तवटे, बळीराम सुर्वे, संदिप माळी, दिपक मांडवकर, प्रविण पवार आदी मावळ्यांनी परिश्रम घेतले.