शिराळा / प्रतिनिधी : सोनवडे, ता. शिराळा येथील आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अरुण उर्फ बाबू सुनील जमदाडे (वय 20...
शिराळा / प्रतिनिधी : सोनवडे, ता. शिराळा येथील आठ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अरुण उर्फ बाबू सुनील जमदाडे (वय 20, रा. सोनवडे, ता. शिराळा) याला न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक एक एस. सी. मनुघाटे यांनी ही शिक्षा सुनावली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, 7 फेब्रुवारी 2018 रोजी आठ वर्षीय मुलगा शाळेतून आल्यानंतर मित्राबरोबर थळपांढरी येथे खेळत होता. आरोपी अरुण जमदाडे याने त्याला जबरदस्तीने घराच्या पाठीमागील बोळात नेऊन त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. घराकडे आल्यानंतर घडलेला प्रकार त्याने आपल्या आईस सांगितल्यानंतर जामदाडे याच्यावर कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीवर इस्लामपूर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. पिडीत मुलगा, फिर्यादी, मेडिकल ऑफिसर व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील रणजीत पाटील यांनी आरोपीने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये. आरोपी हा जामिनावर असताना त्याने सोनवडे येथील महिलेवर बलात्कार केल्याचा नवीन गुन्हा दाखल झाल्याचे सांगितले. यावरून आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा करावी, असा युक्तिवाद केला न्यायाधीश एस. सी. मनुघाटे यांनी आरोपी अरुण जमदाडे याला दहा वर्षे सश्रम कारावास व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा करावास. तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 6 नुसार दहा वर्षे व पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधा कारावासाची शिक्षा सुनावली. तपासी अंमलदार एन.जे. उबाळे, पैरवी अधिकारी चंद्रकांत शितोळे, पोलीस कॉन्स्टेबल पी. जी. आपटे यांनी सरकार पक्षास मदत केली.
-------------------------