जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहे. गावागावात पॅनलची बांधणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवश...
जामखेड/प्रतिनिधी ः जामखेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे जोरात वाहू लागले आहे. गावागावात पॅनलची बांधणी सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज तालुक्यातुन दाखल झाला नाही. दुसर्या दिवशी मात्र दिघोळ- 3, पिंपरखेड-2, पाटोदा-2, नान्नज-2, खर्डा- 1. या ग्रामपंचायतींच्या दहा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
तालुक्यातील सर्वात मोठ्या खर्डा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी भाजप विरूध्द स्थानिक ग्रामविकास आघाडी असा थेट सामना रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. येथे पंचायत समितीचे उपसभापती रवि सुरवसे व माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहेत. 17 सदस्य असलेली खर्डा ग्रामपंचायत ही जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे उपसभापती रवि सुरवसे हे पॅनल प्रमुख असून खर्डा ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी त्यांनी व सहकार्यांनी कंबर कसली आहे. विजयी ठरतील असे दमदार उमेदवारांच्या निवडी निश्चित करण्यात काहीसी अघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सदस्य विजयसिंह गोलेकर हे करत आहेत. त्यांच्या साथीला महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्ते मदतीला आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्व करत असलेल्या ग्रामविकास आघाडीकडे इच्छुकांची संख्या मोठी असल्याने इच्छुकांना समजून सांगतांना, थाबवतांना पॅनल प्रमुखांची कसरत होत आहे.
पाच वर्षात केलेला विकास आम्हाला तारणार : रवी सुरवसे
मागील पाच वर्षांत माजी मंत्री राम शिंदे यांच्या माध्यमातून खर्डा शहराच्या विकासासाठी कोट्यावधीचा निधी आणला. यातून अनेक विकासकामे मार्गी लावले. खर्डा शहराच्या वैभवात भर घालणारे काम केले आहेत. विकासाच्या जोरावरच पुन्हा खर्डा ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित होईल. विकास कामांना जनतेचा आशीवार्द मिळेल.
विकासाच्या व्हिजनला यंदा जनता पाठबळ देईल ः विजयसिंह गोलेकर
खर्डा विकासाचे मॉडेल आमदार रोहित पवारांनी हाती घेतले आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे. खर्ड्यातील जनता विकासाच्या व्हिजनला यंदा पाठबळ देईल ही पक्की खात्री आहे. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेस व स्थानिक ग्रामविकास आघाडीकडे जनतेचा कल वाढला आहे. जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद आमच्या विजयाची नांदी निर्माण करणारा ठरेल यात शंका नाही.