कर्मचार्यांकडून विविध निधीच्या नावावर वसुली सुरू अहमदनगर/विशेष प्रतिनिधी ः कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उदात्त हेतु डोळयासमोर ठेऊन सर्वांनाच...
कर्मचार्यांकडून विविध निधीच्या नावावर वसुली सुरू
अहमदनगर/विशेष प्रतिनिधी ः कर्मवीर भाऊराव पाटील यांनी उदात्त हेतु डोळयासमोर ठेऊन सर्वांनाच शिक्षणाची दारे उघडी केली. विद्यार्थ्यांची जेवणाची सोय व्हावी यासाठी प्रत्येक घरातून मुठभर धान्य गोळा करणारी रयत संस्थेकडे करोडो रुपयांचे घबाड जमा आहे. मात्र त्यातून शिक्षण क्षेत्रात नाविण्यपूर्ण प्रयोग करण्याऐवजी कर्मचार्यांच्या वेतनातून विविध निधी म्हणून रक्कम जमा केली जात आहे. ही रक्कम नेमकी कुणाच्या घशात जाते, याचा कोणताही हिशेब संस्थेकडे नाही.
रयत शिक्षण संस्था दरवर्षी करोडो रुपये गोळा करुन या घबाडाचे नेमके काय करते ?हा प्रश्न सध्यातरी रयतेला पडला असून, आतातरी त्याचा हिशोब जनतेपुढे ठेवण्याची वेळ आली आहे. रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेणारी विद्यार्थी ही कष्टकरी दीन दुबळ्यांची अनाथांची आहे. अशा दीन दलित अनाथांची रयत मायमाऊली असेल तर त्या माऊलीने आतातरी हे भांडार दीन दुबळ्यांसाठी खुले करावे. काहींना दोन वेळचे जेवण, अंगभर कपडे मिळत नाही. पण रयतला त्यांची कधीच करुणा वाटली नाही. सध्याची रयत आणि शिक्षणव्यवस्था बघण्यासाठी अण्णा असते तर त्यांनाही प्रश्न पडला असता मी पत्नीचे दागिणे विकण्याची मोठी चूक तर केली नाही ना ? रयत संस्था नोकरभरती फॉर्म विक्रीतून दरवर्षी सरासरी 10 लक्ष रुपये कमावत होती. त्यात कर्मचार्यांकडून मासिक वेतनातून 1% रक्कम कृतज्ञता निधी या नावाने गोळा केली जाते. याशिवाय कर्मचारी वर्गाकडून एक दिवसाचा पगार कर्मवीर निधीच्या रुपाने घेऊन संस्था आपली तिजोरी नेमकी कशासाठी भरते ते अद्याप समजलेच नाही. मात्र या गोळा होणार्या रकमेची आकडेवारी डोके चक्रावुन आणि डोळे दिपवून टाकणारी आहे.सन 2008-09 मध्ये कर्मचार्यांकडून कृतज्ञतानिधी 1 कोटी 43 लक्ष 68 हजार 861 रुपये इतका आहे. तर कर्मवीर निधीची रक्कम साधारण 1 कोटीच्या पुढे आहे. यातील कर्मवीर निधीची पन्नास टक्के रक्कम संस्थेने दुर्बल शाखांना इमारत बांधकामासाठी दिली आहे. तो कुठल्या शाखांना दिला त्याचा लेखाजोखाही आम्ही उद्याच्या अंकात मांडणारच आहोत. तर कृतज्ञता निधी रयतसेवक को-बॅक शाखा कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे त्यावेळी जमा केलेला होता. दरवर्षी साधारणपणे कर्मचारी वर्गाकडूनच दीड कोटी रुपयांची माया वसुल करून तिचे काय केले जाते. याची कुठेही वाच्यता होत नाही. परंतु या संस्थेच्या पठाणी वसुलीस कर्मचार्यांचा मनापासून विरोध असला तरी जो कुणी या निर्णयास विरोध करील त्याला गैरसोयीच्या ठिकाणी जाण्याची नामुष्की ओढावत असल्यामुळे कर्मचार्यांसाठी हा संस्था पदाधिकार्यांचा निर्णय म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार सोसावा लागत आहे. क्रमशः
कमवा व शिका नव्हे तर शिका व पैसे कमवा
रयत संस्थेचे चेअरमन अण्णांचे नातु असूनही आजोबांची तत्वे, विचारसरणी पुरती धुळीला मिळवली गेली. कर्मवीर अण्णांचे विचारधन कमवा व शिका असे असले तरी प्राध्यापक भरतीप्रक्रिया व बदल्यांत झालेली करोडो रुपयांची उलाढाल आणि कर्मचार्यांकडून करोडो रुपयांच्या निधीची वसुली बघता हेच शब्द उलट झाले असून रयतकडून शिका, आणि पैसे कमवा अशी झाली आहे.