श्री सिध्दनाथ यात्रेचा चेंडू अधांतरी? जिल्हा प्रशासनाकडून व्यापार्यांसह भाविकांना वेटीस धरण्याचा प्रयत्न सातारा / रघुनाथ कुंभार : सातारा...
श्री सिध्दनाथ यात्रेचा चेंडू अधांतरी?
जिल्हा प्रशासनाकडून व्यापार्यांसह भाविकांना वेटीस धरण्याचा प्रयत्न
सातारा / रघुनाथ कुंभार : सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लोकांचे आराध्य दैवत म्हणून ओळखल्या जाणार्या माण तालुक्यातील श्री सिध्दानाथाच्या यात्रेची तयारी करण्याऐवजी प्रशासनाने यात्रेला येणार्या भाविकांना कसा चोपमार देता येईल, या भूमिकेनेच 10 डिसेंबर 2020 रोजी म्हसवड येथील पोलीस परेड ग्राऊंडवर म्हसवड पालिकेच्या नगरसेवकांची बैठक आयोजित केली आहे. प्रशासनाने उशिरा बैठक घेऊन यात्रा रद्द करण्याचाच घाट घातला असल्याचे यामधून दिसून येत आहे. दरवर्षी यात्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने 15 दिवस सर्व तयारी केली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यात्रा होणार कींवा नाही? हे सांगणे अधांतरी ठेवून त्यापेक्षा भाविकांसह यात्रेवर अवलंबून असणारे छोटे व्यापारी तसेच भाविकांना वेटीस धरण्याचा प्रकार केला आहे.
कोव्हीड 19 चा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंनसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार गेल्या नऊ महिन्यापासून सर्व जत्रा-यात्रा, खेळ, विवाह, सभा यासह अन्य सामाजिक कार्यक्रमांना गर्दी केल्यास कारवाई करण्याचा बडगा प्रशासनाने दाखविला आहे. अर्थात या गोष्टी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत हेही तितकेच खरे आहे. मात्र, माण तालुक्यातील म्हसवड येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ यात्रेनिमित्त विविध राज्यातून पाच लाख भाविक जमा होतात. ही यात्रा होणार कींवा नाही, हे एका वाक्यात सांगून टाकण्यापेक्षा त्याबाबत संभ्रम करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून होवू लागले आहे. गेल्या काही दिवसापासून म्हसवड परिसरात यात्रेनिमित्त व्यावसायिक तसेच छोटे व्यापारी व खेळणी विकणार्यांनी यात्रेची तयारी केली आहे. ही यात्रा प्रशासनाने रद्द करण्याच्या दिशेने वाटचाल केल्यामुळे सर्व व्यावसायिक अडचणीत येणार आहेत.
श्री सिध्दनाथ देवाच्या यात्रेवर तालुक्यातील अर्थकारण लपलेले आहे. ही यात्रा म्हणजे परिसरातील गावांना मिळणारी नव संजीवनीच आहे. यात्रेच्या निमित्ताने परराज्यातून येणारे भाविक हेच त्यांचे आप्तेष्ट असतात. यात्रेच्या निमित्ताने ते आपल्या ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी येत असतात.
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गेले आठ महिने सर्व मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. दिपावलीच्या पाढव्यापासून सर्व मंदिरे खुली करताना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार यात्राही रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोनाचा आता प्रभाव कमी होत असताना म्हसवडच्या सिध्दनाथ देवाची यात्रा आहे. या पार्श्वभूमिवर दरवर्षी 15 दिवस आगोदर तयारी केली जाते. मात्र, प्रशासनाकडून काहीही तयारी न झाल्याने प्रसार माध्यमांनी टिकेची झोड उठविल्यानंतर गुरुवार, दि. 10 डिसेंबर रोजी यात्रेच्या नियोजनाबाबत नगरसेवकांची बैठक न घेता वार्षिक यात्रा/जत्रा/उत्सव याप्रसंगी उपाययोजना व घ्यावयाची प्रतिबंधात्मक दक्षतेबाबत बैठक आयोजित करण्यात आली असल्याची नोटीस माणच्या तहसिलदार बाई माने यांनी काढली आहे. यात्रा अवघ्या सहा दिवसावर आलेली असताना प्रशासनाकडून अशा प्रकारे केलेली ढिलाई छोटे व्यापारी तसेच मोठ्या व्यापार्यांच्या नियोजनावर पाणी फिरवणारे आहे. नुकतेच सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत मंदिरे उघण्यासाठी परवानगी दिली असल्याचे सांगितले. मात्र, यात्रेला परवानगी दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट करत यात्रेनिमित्त कोणी येत असेल तर कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट केल्याने जिल्हा प्रशासनाच्या दुटप्पीपणा समोर आला आहे. प्रशासन यात्रेला परवानगी देणार नव्हते हे यापूर्वीच जाहीर करायला हवे होते. यात्रा सहा दिवसावर आल्यानंतर याबाबत सांगून भाविकांसह छोट्या व्यापार्यांना अडचणीत आणण्याचा प्रकार प्रशासनाकडून झाला आहे.