जामखेड/प्रतिनिधी ः तु दिसायला चांगली नाही, तुला घरातील कामे येत नाहीत तसेच चारित्र्याचा संशय घेत विवाहितेचा होत असलेल्या छळाला कंटाळून आर...
जामखेड/प्रतिनिधी ः तु दिसायला चांगली नाही, तुला घरातील कामे येत नाहीत तसेच चारित्र्याचा संशय घेत विवाहितेचा होत असलेल्या छळाला कंटाळून आरोळे वस्ती येथील विवाहिता मालन परशुराम लोखंडे हीने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पती सासू सासरे या तीन जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच विवाहितेच्या माहेरकडील लोकांनी जामखेड पोलीस स्टेशनसमोर मोठी गर्दी करीत जोपर्यंत सासरकडील लोकांवर खुनाचा गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार असा पवित्रा घेतला होता. मात्र नव्यानेच रूजू झालेल्या पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मध्यस्थी करत समजावून सांगितले. व मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. विवाहितेचा भाऊ संतोष तात्या शिंदे देवळाली ता. करमाळा यांनी फिर्यादीनुसार शहरातील आरोळे वस्ती येथे सासरी नांदत आसलेल्या विवाहितेचा छळ आरोपी नवरा परशुराम यादव लोखंडे, सासरे यादव लोखंडे व सासु ताई यादव लोखंडे (रा.आरोळे वस्ती) हे तिघे करीत असत. तु दिसायला चांगली नाही, तुला घरातील कामे नीट येत नाहीत, तुला स्वयंपाक येत नाही असे म्हणून वारंवार तिचा छळ केला जात होता. तसेच नवरा देखील तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करीत असे. याच मारहाण व छळाला कंटाळून विवाहितेने 30 नोव्हेंबर रोजी घरातील छताला गळफास घेतला. जामखेड येथे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान 6 डिसेंबर रोजी मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बडे साहेब हे करीत पोलीसांनी आरोपी पती परशुराम लोखंडे यास अटक केली आहे.