सातारा / प्रतिनिधी : शाहूपुरी भागाला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठीच्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा आढावा नुकताच खासदार उदयनराजे भोसले यांनी...
सातारा / प्रतिनिधी : शाहूपुरी भागाला अखंडित पाणीपुरवठा करण्यासाठीच्या कण्हेर पाणी पुरवठा योजनेचा आढावा नुकताच खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला. आढावा घेतल्यानंतर वाढीव लोकवस्तीचा विचार करत नवीन योजनेतून मागेल त्याला नळ कनेक्शन देण्याच्या सूचना उदयनराजे यांनी प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे आणि पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना दिल्या.
शाहूपुरी हद्दीतील लोकवस्तीच्या अखंडित पाणी पुरवठ्यासाठीच्या कण्हेर धरण पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम अंतिम टप्प्यात असताना हद्दवाढीमुळे शाहूपुरी ग्रामंचायतीचा सातारा नगरपालिकेत समावेश झाला. याच काळात योजनेसाठीचा वाढीव निधी खासदार उदयनराजे यांच्या प्रयत्नातून आणि माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील यांच्या पाठपुराव्यातून प्राधिकरणाकडे शासनाने वर्ग झाला. उदयनराजे यांनी पाणी योजनेचा नुकताच आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, कार्यकारी अभियंता पल्लवी मोटे, मुख्याधिकारी अभिजित बापट, संजय पाटील, अमित कुलकर्णी उपस्थित होते.
सध्या चार हजार 500 इतके ग्राहक असून, त्यांना नवीन योजनेतून प्राधान्याने नळ कनेक्शन देण्यात येणार असल्याची माहिती मोटे यांनी बैठकीत दिली. संजय पाटील यांनी जुने चार हजार पाचशे आणि वाढीव लोकसंख्येचा विचार करता नव्याने 5 हजार नळ कनेक्शन द्यावी लागतील, असा मुद्दा उपस्थित केला. मुद्दा ऐकून घेतल्यानंतर उदयनराजे यांनी जुन्या ग्राहकांना प्राधान्याने कनेक्शन देताना नव्याने मागणी करणार्यांनाही नियमानुसार कनेक्शन देण्याच्या सूचना दिल्या.
पालिकेने घेतला कामाचा आढावा
प्राधिकरणाच्या माध्यमातून शाहूपुरी, तसेच शहरालगतच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यात येतो. हद्दवाढीमुळे हा परिसर पालिकेत सहभागी झाला आहे. त्याठिकाणचा पाणीपुरवठा यापुढील काळात पालिकेच्या माध्यमातून करावा लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शाहूपुरीतील ग्राहकांच्याकडून घेतलेली अनामत रक्कम याची माहिती प्राधिकरणाकडून मागवली होती. यानुसार ती माहिती पालिकेस देण्यात आली आहे.