11 डिसेंबरला सुनावणी; संपतीची चौकशी करण्याची मागणी अहमदनगर / प्रतिनिधीः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार...
11 डिसेंबरला सुनावणी; संपतीची चौकशी करण्याची मागणी
अहमदनगर / प्रतिनिधीः यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी, सकाळचा माजी कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीनअर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
आरोपीतर्फे सादर करण्यात आलेल्या अर्जावर न्यायालयाने सरकारी पक्षाचे म्हणणे मागवले आहे. दरम्यान, आरोपीतर्फे तात्पुरत्या जामिनाचीही मागणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे अर्ज दाखल झाल्यानंतरही बोठेला कोणताही दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणात बोठे याच्या वतीने अॅड. महेश तवले यांनी सोमवारी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज दुपारी सुनावणी झाली. अॅड. तवले यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने यावर सरकारी पक्षाला म्हणणे सादर करण्यास सांगितले. त्यावर पुढील सुनावणी आता 11 डिसेंबरला होणार आहे. अशा प्रकरणांत शक्यतो आरोपीकडून तात्पुरत्या जामिनाची मागणी केली जाते; मात्र यामध्ये अशी मागणी करणे टाळले आहे. त्यामुळे पुढील सुनावणीवेळी दोन्ही बाजू ऐकूनच न्यायालयाचा निर्णय होणार आहे.
दरम्यान, बोठे याच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी अॅड. सुरेश लगड यांनी केली आहे. बोठे याची आर्थिक परिस्थिती इतकी भक्कम कशी झाली, त्याच्याकडे चारचाकी गाड्या, बंगले, अज्ञात संपती कशी आली, याची चौकशी करण्याची मागणी अॅड. लगड यांनी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. बोठे याच्या कथित पदव्यांची सत्य, असत्यता पडताळून पाहण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अभ्यासमंडळावर खुनाचा आरोपी
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्राच्या अभ्यास मंडळावर बोेठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याची शिफारस कुणी केली, त्याची पुस्तके अभ्यास मंडळात कुणी लावली आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असताना त्याची नियुक्ती रद्द का केली जात नाही, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
------------------------