राहुरी / श. प्रतिनिधी : नगर - मनमाड राज्य महामार्गावरील गुहा पाटाच्या पुढील काटवणामध्ये काही इसम संशयितरित्या दरोडा टाकण्याचा उद्देशाने ...
राहुरी / श. प्रतिनिधी : नगर - मनमाड राज्य महामार्गावरील गुहा पाटाच्या पुढील काटवणामध्ये काही इसम संशयितरित्या दरोडा टाकण्याचा उद्देशाने फिरत असल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसानी ताबडतोब कारवाई करत ४ दरोडेखोरांना तात्काळ अटक केली.मात्र अंधाराचा फायदा उचलत ३ दरोडेखोर पळाले.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मनमाड राज्य महामार्गावरील गुहा पाटाच्या पुढील काटवणामध्ये काही इसम संशयितरित्या दरोडा टाकण्याचा उद्देशाने फिरत असल्याची खबर मिळाली. त्या दृष्टीने पोलीसानी सापळा रचला. पोलीसांनी कोल्हार फाट्याचे अलीकडे दबा धरून दरोदेखोरांबाबत खात्री करुन घेतली. त्यावेळी तेथे ५ ते ७ इसम एका अशोक लेलँड पिकअपच्या आडोश्याला उभे राहून रस्त्याने जाणारे येणारे वाहनांना हातवारे करुन थांबविण्याचा प्रयत्न करीत असतांना दिसत होते. पोलीस पथक व पंचाची खात्री होताच संशयितरित्या उभे असलेल्या ४ जणांना पोलिसांनी हटकले पण ते पळून जात आहे तेव्हा त्यांना शिताफीने पकडून ताब्यात घेतले. तर ३ जणांचा पोलीसांनी पाठलाग केला असता ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. दरोडेखोरांना पकडण्याची महत्वपूर्ण कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ह्यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संदीप मिटके ह्यांचे सूचनेवरून पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे ह्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पो.हे.काँ. अण्णासाहेब चव्हाण, संजय राठोड, पालवे, खेमनर, प्रवीण अहिरे ह्यांनी सदर कामगिरी यशस्वीरीत्या पुर्ण केली.
पकडलेल्या दरोडेखोरांमध्ये गणेश बाळासाहेब शेंडगे (वय २१ वर्ष, रा. चिंचोली फाटा) किरण उर्फ विकी बबन थोरात( वय २५ वर्ष, चिंचोली फाटा) आकाश बाबासाहेब वाकडे (वय २२ वर्ष.रा. गुहा पाट), नवनाथ नंदकुमार पाचारणे ( वय २० वर्ष,रा. डिग्रस) अशी नावे असून त्यांच्याकडे एक अशोक लेलॅड कंपनीची मालवाहू गाडी ( MH17,BT4533) ही गाडी तसेच दरोडा घालण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. अधिक चौकशी केली असता त्यांचेकडून फरार झालेल्या आरोपींची नावे समजली.त्यात अभी अशोक जाधव( रा. कोल्हार खुर्द), प्रकाश भोसले (रा.चिंचोली फाटा) विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याचे समजले.
सदर इसमाविरुद्ध राहुरी पोलिसांनी कलम ३९९,३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना १८ डिसेंबर२०२० अखेर पोलीस कोठडी दिली आहे. सदर आरोपींकडे सायबर सेल श्रीरामपूर येथील हेड कॉन्स्टेबल राजेंद्र गोडगे, प्रमोद जाधव फरकान शेख, आकाश बैराट उपविभागीय पोलीस श्रीरामपूर अधिकारी यांचे पथकातील सुनील शिंदे, रवींद्र मेढेनी चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केले. २ नोव्हेंबर २०२० रोजी चिंचोली फाटा येथील योगेंश मिठूलाल मुथा ( वय ३८ वर्ष, रा. कोल्हार बु. ता. राहाता) ह्यांची कांद्याची शेडची जाळी कापून ९५ हजार रुपये किंमतीचा१०० गोणी कांदा लबाडीच्या उद्देशाने चोरून नेला. याबाबत राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.वरील आरोपी विरुद्ध विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून त्याबाबत चौकशी सुरु आहे.