किसान आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार संगमनेर/प्रतिनिधी : दिल्लीत दि. २६ नोव्हेंबर पासून तीन काळे कृषी कायदे रद्द करा, शेतमालाला हमी ...
किसान आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
संगमनेर/प्रतिनिधी :
दिल्लीत दि. २६ नोव्हेंबर पासून तीन काळे कृषी कायदे रद्द करा, शेतमालाला हमी भाव द्या इत्यादी मागण्यांसाठी किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात आजवर तेहतीस शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. केंद्र सरकारच्या संवेदनशून्य धोरणांमुळे हे मृत्यू झाले आहेत. आंदोलक शेतकरी शहीद झाले आहेत. देशभर आज या शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
संगमनेर येथे किसान संघर्ष समितीच्या वतीने महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर सकाळी किसान संघर्ष समितीच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी साथी निशा शिवूरकर, कॉ. अनिल गुंजाळ, प्रा. शिवाजी गायकवाड यांनी किसान आंदोलनातील शहिदांच्या मृत्यू बद्धल दुःख व्यक्त केले. किसान संघर्ष समितीचे संयोजक प्रा. शिवाजी गायकवाड बोलताना म्हणाले, शहीद शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाणार नाही. मोदी सरकारचा पराभवाची शवपेटी या आंदोलनात तयार होते आहे. किसान आंदोलन यशस्वी होणार याचा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. सुभाष लांडे प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना म्हणाले की, मोदी सरकार कामगार, शेतकरी व गरीब जनतेच्या विरोधी आहे. तीन काळे कृषी कायदे केल्यामुळे हे सरकार भांडवलदार धार्जिणे असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशभरातील ५०० शेतकरी संघटना मोदी सरकार विरोधात रस्त्यावर आल्या आहेत. जनतेने या संघर्षात सहभागी व्हावे.
यावेळी साप्ताहिक युगांतर या किसान आंदोलनावरील विशेष अंकाचे प्रकाशन कॉ. दशरथ हसे आणि निशाताई शिवूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अनिल भोसले, ज्ञानेश्वर राक्षे, कॉ. अंबादास दोंड, ॲड अनिल शिंदे, रोहित कदम आदी उपस्थित होते.