अहमदनगर / प्रतिनिधी: वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झाले. त्या धक्क्यातून कुटुंब आणखी सावरलेही नव्हते, तोच रायकर ...
अहमदनगर / प्रतिनिधी: वृत्तवाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनाने निधन झाले. त्या धक्क्यातून कुटुंब आणखी सावरलेही नव्हते, तोच रायकर कुटुंबावर आणखी एक मोठा आघात झाला आहे. पांडुरंग रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचे कोरोनाने निधन झाले आहे.
लक्ष्मण रायकर यांच्यावर नगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. अखेर उपचारादरम्यान आज सकाळी आठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. लक्ष्मण रायकर श्रीगोंदे तालुक्यातील हंगेवाडी येथे भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी सून आणि तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रायकर हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे होते. पंचक्रोशीत त्यांना चांगला मान होता.
पांडुरंग रायकर यांना जाऊन चार महिनेही पूर्ण होत नाहीत, तोच रायकर कुटुंबावर दुसरा मोठा आघात झाला. त्यामुळे रायकर कुटुंब कोलमडून पडले आहे, तर हंगेवाडी गाव शोकसागरात बुडाले आहे. कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. दोन सप्टेंबर रोजी पुण्यातल्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियाक अँम्बुलन्स न मिळाल्याने त्यांना योग्य ते उपचार वेळेवर मिळाले नाहीत. अखेर वयाच्या 42 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.