सांगली / प्रतिनिधी : सांगली महापालिकेने शहरात रस्त्यावर बेवारस पडून असणार्या वाहनांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. शनिवारी या मोहिमेत शहर...
सांगली / प्रतिनिधी : सांगली महापालिकेने शहरात रस्त्यावर बेवारस पडून असणार्या वाहनांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे. शनिवारी या मोहिमेत शहरातील 12 तर मिरज शहरातील 10 वाहने मनपाने ताब्यात घेतली आहेत. ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख दिलीप घोरपडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, मनपा क्षेत्रात रस्त्यावर अनेक वर्षे अनेक वाहने पडून आहेत. त्यांचे मालक तिकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे अस्वच्छतेबरोबर शहराचे विद्रुपीकरण होत आहे. रस्त्यात अडथळासुध्दा निर्माण होत आहे. त्यामुळे अशी रस्त्यावर पडून असणारी सर्व वाहने हटविण्याचे आदेश आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिले आहेत. त्याअंतर्गत उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारपासून रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याच्या मोहिमेला सुरवात झाली.
सांगलीत सहाय्यक आयुक्त एस. एस. खरात आणि घोरपडे यांनी पोलिस बंदोबस्तात गेस्ट हाऊस परिसर तसेच शंभर फुटी रोडवरील 12 वाहने क्रेनच्या साहाय्याने उचलून ताब्यात घेतली. या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक अतुल आठवले, श्रीकांत मद्रासी, अंजली कुदळे, कोमल कुदळे, विक्रम घाडगे यांनी सहभाग घेतला. यामध्ये 10 कार आणि 2 ट्रकही उचलण्यात आले आहेत.
मिरजेत उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक आयुक्त दत्तात्रय गायकवाड यांच्या पथकाने एकूण 10 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये 8 बेवारस कार आणि 2 दुचाकी उचलण्यात आल्या. ही मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे.
अतिक्रमणेही तातडीने हटवा
महापालिकेने बेवारस वाहने जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. ती खंबीरपणे आणि सातत्याने राबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. त्याचबरोबर शंभरफुटी रस्त्यासह अन्य रस्त्यांवरही तसेच गल्ली-बोळात झालेली अतिक्रमणे महापालिकेने कठोरपणे हटवावीत. तरच सांगली शहरातील वाहतुकीला शिस्त येईल, अशी लोकांची अपेक्षा आहे.