भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सध्या बरीच चर्चा होत आहे. भारताने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया...
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आगामी चार सामन्यांच्या कसोटी मालिकेची सध्या बरीच चर्चा होत आहे. भारताने २०१८-१९ मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. यंदाच्या मालिकेत मात्र ऑस्ट्रेलियाचे पारडे जात मानले जात आहे. त्यातच भारताचा कर्णधार विराट कोहली पितृत्व रजेवर जाणार असून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. मात्र, असे असतानाही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला झुंज देईल असे भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर यांना वाटते. तसेच कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची भिस्त अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या अनुभवी फलंदाजांवर असेल, असे मत इंजिनियर यांनी व्यक्त केले.
विराट फारच उत्कृष्ट फलंदाज आहे. तो ज्याप्रकारे प्रतिस्पर्धी संघावर दबाव टाकतो, खासकरून ऑस्ट्रेलियावर, ते कौतुकास्पद आहे. आता तो वैयक्तिक कारणास्तव तीन कसोटीला मुकणार आहे. मी त्याला आणि अनुष्काला शुभेच्छा देतो. भारतीय संघाला विराटची उणीव भासेल, पण तो मायदेशात परतण्याआधी भारतीय संघ कसोटी मालिकेत आघाडी घेईल अशी मला आशा असल्याचे इंजिनियर म्हणाले.
रोहितसुद्धा उत्कृष्ट फलंदाज आहे. बीसीसीआयने अनफिट घोषित केल्यानंतरही तो आयपीएलमध्ये खेळला याचे मला आश्चर्य वाटले. परंतु, हा बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाचा निर्णय होता. मला त्याबाबत फार काही बोलायचे नाही. विराटच्या अनुपस्थितीत रोहितची भूमिका महत्त्वाची असणार आहे. भारतीय संघाला रोहितची गरज आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार आहे आणि विराटच्या अनुपस्थितीत त्याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. रोहित कसोटी संघात असल्यास रहाणेला खूप मदत होईल, असेही इंजिनियर यांनी नमूद केले.