बीड/प्रतिनिधी ः शहरातील ख्रिश्चन कब्रस्तान जमिन सर्वे नंबर 37 च्या गैरव्यवहारात बीड नगर परिषद, माजी नगरसेवक सय्यद मुस्तफा, निवृत्त पोलिस ...
बीड/प्रतिनिधी ः शहरातील ख्रिश्चन कब्रस्तान जमिन सर्वे नंबर 37 च्या गैरव्यवहारात बीड नगर परिषद, माजी नगरसेवक सय्यद मुस्तफा, निवृत्त पोलिस कर्मचारी प्रताप लांडगे, जिल्हा परिषद शिक्षक आशिष शिंदे व समाजातील इतरांना पाठीशी घालत अभय देत असल्याबद्दल या प्रकरणी आपण जातीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी तथा समाजसेवक हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, बीड शहरामध्ये अल्पसंख्य असलेल्या ख्रिश्चन बांधवांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात निजाम राजवटीत शहरातील राजुरी वेस जवळ असलेल्या मर्कज़ मशीदच्या बाजूला चर्च आणि फादर नेगरी यांची कबर होती. तर सद्यस्थितीत राजूरी वेस जवळ असलेल्या हैदराबाद बँकेच्या बाजूला ख्रिश्चन कब्रस्तान होते. परंतु अल्पसंख्येत असलेल्या ख्रिश्चन समाज आणि मुस्लिम समाजामध्ये या दोन जागांवरुन आपसात तेढ निर्माण होऊ नये म्हणून तत्कालीन यंत्रणेने शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या दोन्ही ठिकाणाहून चर्च आणि कब्रस्तान हलविले. पर्याय म्हणून येथील जागेच्या मोबदल्यात अहेमदनगर रोडच्या पोलीस मुख्यालय शेजारी असलेली मोकळी जागा कब्रस्तान साठी अंदाजे सन 1920 मध्ये देण्यात आली. याच जागी फादर नेगरी यांचे पार्थिव सुद्धा पुन्हा एकदा दफन करण्यात आले. तेव्हापासून ख्रिश्चन समाज बांधव मृत झाल्यानंतर बीड शहरच नाही तर संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, पाटोदा, शिरूर कासार, आष्टी यासह इतर तालुक्यातूनही दफन करण्यासाठी याच कब्रस्तानात आणले जातात. हे पाहता सद्यस्थितीत ख्रिश्चन कब्रस्तान ची जागा पुढे चालून कमी पडणार आहे. असे असताना बीड नगरपरिषदेने धानोरा रोड आणि अंकुश नगर रस्त्याच्या बाजूची कब्रस्तान ची लाख-मोलाची मोक्याची जागा माजी नगरसेवक सय्यद मुस्तफा, निवृत्त पोलिस कर्मचारी प्रताप लांडगे आणि जिल्हा परिषद शिक्षक आशिष शिंदे यांच्यासह समाजातील इतर लोकांच्या सोबत संगणमत करून कब्रस्तान च्या जमिनीतून 100 बाय 40 , 100 बाय 40 असे दोन प्लॉट चे व्यवहार अंधारातून केले. या सर्व प्रकाराला विद्यमान नगराध्यक्षांनी सुद्धा मतांच्या लाचारीतून मदत करत कब्रस्तान ची जागा कमी केली. विशेष म्हणजे नगराध्यक्षांमुळेच कलम 144 लागू असताना सुद्धा कोविड 19 साठी चे लॉक डाऊन लावलेले असतानाही गुत्तेदार वाघ याला हाताशी धरून कब्रस्तान च्या कमी केलेल्या जागेवर चुकीच्या पद्धतीने कंपाउंड वॉल चे बांधकाम करून घेतले. यामुळे कब्रस्तान ची जागा कमी झाली आहे. ही बाब याअगोदरही आपल्या कार्यालयात निवेदनांच्या माध्यमातून अनेकदा मांडलेली आहे. परंतु आजपर्यंत या प्रकरणाकडे आपण किंवा आपल्या कार्यालयाने लक्ष न दिल्याने बीड नगर परिषदेने कागदी घोडे नाचवत या प्रकरणातून आपल्याला अलगद बाजूला करण्याचे प्रयत्न चालविले असून बीड नगरपरिषद कार्यालयाने याप्रकरणी तालुका भूमापन कार्यालयाला कब्रस्तान च्या जागेची पुन्हा मोजणी करण्याचे षडयंत्र चालविले आहे. जेणेकरून हा मुद्दा थंड बस्त्यात जावा. यासाठी बीड नगरपरिषद अंग काढून घेत असून कब्रस्तान च्या जमिनीचा गैरव्यवहार करणार्यांना अभय देत पाठीशी घालण्याचे प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे यापुर्वीही ख्रिश्चन कब्रस्तान च्या जमिनीची जागा बाळशास्त्री जांभेकर सहकारी संस्था बीड पत्रकारांच्या निवास प्रयोजनार्थ पत्रकार गृहनिर्माण संस्थेला देण्यात यावी या मागणी साठी सुद्धा सन 2008 मध्ये कब्रस्तान च्या जागेची मोजणी शासकीय-प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेली आहे. तरी सुद्धा बीड नगर परिषद पुन्हा एकदा मोजणीचेच घोडे दामटवत आहे. तरी आपण दोन्ही अधिकार्यांनी मिळून ख्रिश्चन समाज बांधवांना आता तरी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा अशी रास्त व न्याय्य मागणी पुन्हा एकदा आपल्या दोघांकडेही करीत आहे. आपण ख्रिश्चन कब्रस्तान च्या जमिनीचा सोक्षमोक्ष लवकरात लवकर लावावा. अन्यथा लोकशाही मार्गाने नाईलाजास्तव ख्रिश्चन समाज बांधवांना आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करावे लागेल. असा इशारा ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी तथा समाजसेवक हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी यांनी जिल्हाधिकारी व उपविभागीय दंडाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.