पुणे ः राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील ...
पुणे ः राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा झालेला दारूण पराभव आणि महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश यामुळे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीत खळबळ उडाली आहे. महायुतीत अडगळीत पडलेल्या मित्रपक्षांनी नवी मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चेस उधाण आले आहे. ही भेट साखर कारखान्याच्या प्रश्नांशी संबंधित असल्याचे जानकर सांगत असले, तरी जानकर हे लवकरच महाआघाडीत सामील होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
जानकर यांनी तीन तारखेला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घेतली. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास खलबते झाली. जानकर यांनी ही राजकीय भेट नसल्याचे जाहीर केले आहे. रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या साखर कारखान्याच्या कामानिमित्ताने पवार यांची भेट घेण्यात आल्याची सारवासारव जानकर यांनी केली आहे. पवार यांची भेट घेण्याआधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना या भेटीची कल्पना दिली होती, असा दावाही जानकर यांनी केला आहे.
नुकत्याच झालेल्या विधान परिषदांच्या निवडणुका, त्यात भाजपला आलेले अपयश आणि तीन पक्षांच्या आघाडीला मिळालेले यश या पार्श्वभूमीवर जानकर यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. आगामी काळातही या तिन्ही पक्षांनी एकत्र निवडणुका लढवल्या, तर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जानकर हे नव्याने राजकीय समीकरण जुळवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. जानकर यांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरी ते मात्र, स्वत: सत्तेच्या पदापासून दूर आहेत. तसेच त्यांच्या पक्षाचे कामही थंडावले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी जानकर यांच्याकडून जुळवाजुळव करण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर भाजपने त्याबाबतचं चिंतन केले. या चिंतन बैठकीला भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या वेळी बदलत्या राजकीय गणितांचा आढावा घेण्यात आला, तसेच नव्या स्ट्रॅटेजीवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीत महायुतीतील एकाही मित्र पक्षाला बोलावण्यात आले नव्हते. तसेच भाजपने अजूनही मित्रपक्षासोबत या निवडणूक निकालाबाबत चर्चा केलेली नाही. त्यामुळे मित्र पक्षांमध्ये नाराजीचा सूर आहे.
2014च्या लोकसभा निवडणुकीत जानकर यांनी बारामतीतून राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या वेळी त्यांनी प्रचंड मते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला होता. बारामतीने त्या वेळी सुळे यांना साथ दिली नसत,ी तर निकालाचे चित्र वेगळे असते.