कोल्हापूर / प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या नुकत्याच झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावरच्या बाज...
कोल्हापूर / प्रतिनिधी : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या नुकत्याच झालेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावरच्या बाजूला पाच फुटाचा कॉंक्रीटचा थर असल्याचे आढळून आले आहे. तसेच काही ठिकाणी झाडांची मुळे आहेत. हा धोकादायक थर आणि झाडांची मुळे काढून लवकरच छताचे वॉटरप्रूफिंग केले जाणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी जाधव यांनी गेल्या तीन वर्षातील देवस्थान समितीच्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले, मुळ स्वरुपात मंदिर येण्यासाठी पुरातत्व विभाग, हेरीटेज समितीच्या सुचना व नियमांचे पालन करून सध्या मंदिरात विविध कामे सुरू आहेत. पहिल्यांदा मनकर्णिका कुंडाचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. तो भाविकासाठी खुला केल्यानंतर रामाचा पार बांधकाम पुर्णत्वाला येईल. जोतिबावरील दर्शन मंडप, नृसिंंहवाडी येथील भक्त निवास आदी विकास कामे वेगाने सुरू आहेत.
समितीकडून 650 मंदिरांचा आणि 1 हजार हेक्टर जमिनीचा सर्वे पुर्ण झाला आहे. अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचे नुतनीकरण पुरातत्व विभागाच्या सुचनेनुसार केले जाणार आहे. त्याशिवाय इंदिरा गांधी विद्यालयाच्या जागेत पाच मजली यात्रीनिवास उभारले जाणार आहे. त्या बांधकामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पत्रकार परिषदेला शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, शांताराम गरुड, चारुदत्त देसाई, सचिव विजय पोवार उपस्थित होते.