म्हसवड / वार्ताहर : येथील श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्वरी देवस्थानची देव दिवाळीस मंगळवार, दि. 15 रोजी भरणारी यात्रा कोरोनाच्या साथीमुळे रद्द ...
म्हसवड / वार्ताहर : येथील श्री सिध्दनाथ-देवी जोगेश्वरी देवस्थानची देव दिवाळीस मंगळवार, दि. 15 रोजी भरणारी यात्रा कोरोनाच्या साथीमुळे रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत म्हसवड शहर व श्री सिध्दनाथ मंदिर परिसरात संचार बंदी लागू करण्यात येणार आहे. भाविकांनी रथयात्रेस येऊ नये, असे आवाहन खटाव-माणचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले आहे.
येथील यात्रेसंदर्भात म्हसवड पोलीस ठाणे आवारात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक डॉ. देशमुख, तहसीलदार बाई माने, सपोनि बाजीराव ढेकळे, रथाचे मानकरी माजी नगराध्यक्ष अजितराव राजेमाने, विलासराव माने, नगराध्यक्ष तुषार विरकर, उपाध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, नगरसेवक धनाजी माने, अखिल काझी, शहाजी लोखंडे, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दीपसिंह राजेमाने,नगरसेवक दीपक बनगर, केशव कारंडे सयाजीराजे राजेमाने, मंदिराचे सालकरी व सिध्दनाथ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त, सचिव दिलीप कीर्तने, युवराज सूर्यवंशी व शासकीय आरोग्य, राज्य परिवहन महामंडळ, वीज वितरण कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधींसह रथाचे विविध मानकरी उपस्थित होते.
यावेळी सूर्यवंशी म्हणाले, राज्यात,जिह्यात सध्या कोरोनाची साथ सुरु असून शासनाने 31 डिसेंबरअखेर काही अटी-शर्तींवर लॉकडाऊन जाहीर केले आहे. म्हसवड येथे कोरोना बाधित रुण आढळून येत आहेत. यामुळे यात्रेकरू तसेच येथील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येथील श्री सिध्दनाऊ देवस्थानची यात्रा भरवली जाणार नाही. यात्रेतील पारंपरिक रथ मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यात्रा मैदानात व्यावसायिकांनी दुकाने थाटू नये. तसेच म्हसवड नगरीस जोडलेले सर्व रस्ते वाहतुकीस बंद करून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात येणार आहे. भाविकांना म्हसवड नगरीसह यात्रा व मंदिर परिसरात प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार मंदिरातील कार्यक्रम विधी पुजारी मंडळीच्या उपस्थितीत शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार धार्मिक विधी पार पाडावेत. यात्रेकरूंनी रथयात्रेस व मंदिरात दर्शनासाठी येऊ नये.
यावेळी अजितराव राजेमाने, दिलीप किर्तने, युवराज सूर्यवंशी, अकील काझी, पृथ्वीराज राजेमाने आदींनी चर्चेत भाग घेतला. बैठकीनंतर येथील श्री सिध्दनाथ मंदिर, यात्रा परिसर व श्रींच्या रथास उपस्थितांनी भेटी देऊन पाहणी केली.