आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने आज कसोटी खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना सं...
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे आयसीसीने आज कसोटी खेळाडूंची नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना संमिश्र लाभ झालेला दिसून येत आहे. फलंदाजांसाठी काहीश्या निराशाजनक राहिलेल्या ऍडलेड कसोटीत उत्तम कामगिरी करणार्या ऑस्ट्रेलियाच्या जोस हेजलवूड व भारताच्या रविचंद्रन अश्विन यांना या क्रमवारीत फायदा झाला. फलंदाज व गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाचेच दोन्ही खेळाडू आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या ऍडलेड कसोटीनंतर आयसीसीने कसोटी खेळाडूंची नवी क्रमवारी रविवारी जाहीर केली. फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या सहा स्थानी कोणताही बदल झाला नाही. अव्वल स्थानावर असलेल्या स्टीव स्मिथ व द्वितीय स्थानावर असलेल्या विराट कोहली यांच्यातील गुणांचे अंतर मात्र 10 रेटिंग गुणांनी कमी झाले आहे. पहिल्याच सामन्यात 2 धावा केल्याने स्मिथला 10 गुणांचे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे विराट आणि स्मिथ यांच्यात आता फक्त 13 गुणांचे अंतर शिल्लक राहिले आहे. विराट उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध नसल्याने स्मिथ काही चांगल्या खेळ्या करून आपले अव्वल स्थान बळकट करू शकतो.
पहिल्या सामन्यात खराब कामगिरी केल्याने भारताचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना प्रत्येकी एका स्थानाचे नुकसान सहन करावे लागले. पुजारा सातव्या स्थानावरुन आठव्या तर रहाणे अव्वल दहामधून बाहेर पडत 11 व्या स्थानी घसरला. पुजारा व रहाणेने ऍडलेड कसोटीच्या पहिल्या डावात प्रत्येकी 47 व 42 धावांच्या खेळ्या केल्या होत्या. दोन्ही फलंदाजांना दुसर्या डावात भोपळाही फोडता आला नाही. गोलंदाजांच्या क्रमवारीत पॅट कमिन्सने आपले पहिले स्थान अबाधित राखले. स्टुअर्ट ब्रॉड, नील वॅग्नर व टीम साऊदी अव्वल चारमध्ये कायम आहेत. ऍडलेड कसोटीत भारताचा दुसरा डाव 36 धावांमध्ये गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचललेल्या जोस हेजलवूडला या क्रमवारीत मोठा फायदा झाला. याआधी, आठव्या स्थानी असलेला हेजलवूड नव्या क्रमवारीत पाचव्या स्थानी विराजमान झाला आहे. पहिल्या डावात पोहोचल्याचे चार गडी बाद करणारा भारताचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हादेखील दहाव्या स्थानावरुन नवव्या स्थानी आला. पहिल्या सामन्यात दोन गडी बाद करणारा जसप्रीत बुमराह एका स्थानाच्या नुकसान दहाव्या स्थानी घसरला आहे.