कोपरगाव/ता.प्रतिनिधी : शेतक-यांच्या मागणीनुसार शासनाने आधारभूत योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यास सुरूवात केली, परंतु अल्पावधीतच ही खरेदी ब...
कोपरगाव/ता.प्रतिनिधी : शेतक-यांच्या मागणीनुसार शासनाने आधारभूत योजनेअंतर्गत मका खरेदी करण्यास सुरूवात केली, परंतु अल्पावधीतच ही खरेदी बंद केली असल्याने शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. राज्य शासनाने त्वरीत मका खरेदीचे केंद्र सुरू करून शेतक-यांना दिलासा दयावा. अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे केली आहे.
कोरोना परिस्थितीत देशभर असलेल्या लाॅकडाउनमुळे राज्यातील व्यवहारही ठप्प झालेले होते, दळणवळण पुर्णपणे बंद असल्यामुळे शेतक-यांनी पिकविलेला माल विकण्यासही मर्यादा आल्या, पर्यायाने शेतक-यांना मोठया आर्थीक अडचणींचा सामना करावा लागला. समाधानकारक पाउस झाल्यामुळे आर्थीक परिस्थितीवर मात करत शेतक-यांनी पीके उभी केली.पिकांच्या उत्पन्नातही वाढ झाली,या मकांची खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने सुरूवातही केली होती. परंतु अल्पावधीत ही मका खरेदी केंद्रे बंद पडली असल्याने शेतक-यांचा भ्रमनिरास झाला. मोठया कष्टाने हाताशी आलेल्या पिकांला विकण्याची सोय राहिली नसल्याने हिरमोड झाला. त्यामुळे हे सरकार शेतक-यांच्या हितासाठी काही करणार आहे का? नेहमीप्रमाणे वा-यावर सोडणार? त्यामुळे तातडीने राज्य सरकारने मका खरेदी केंद्र सुरू करून शेतक-यांना दिलासा दयावा.