मुंबई / प्रतिनिधी : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष आघाडी म्हणून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकाही एकत्र लढेल असा अंदा...
मुंबई / प्रतिनिधी : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष आघाडी म्हणून मुंबईसह राज्यातील इतर महानगरपालिकाही एकत्र लढेल असा अंदाज बांधला जात होता; मात्र आता आघाडीतील या तिन्ही पक्षांमधून स्वबळाचीही भाषा होऊ लागली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुंबईचा काँग्रेसचाच असेल असे म्हणत दंड थोपटले आहेत.
थोरात म्हणाले, की काँग्रेस पक्षाच्या आवाजाने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक गाजणार आहे. काँग्रेस यंत्रणेने सर्व ताकद लावली, तर मुंबईचा महापौर होण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. सरकार आले, त्यात काही प्रश्न आहेत. नसीम खान यांना सांगतो, की काँग्रेस पक्ष श्रेष्ठ आहे. त्याचा सन्मान राखण्यात कधीच तडजोड नाही. अशोक चव्हाण आणि मी हक्काने याबाबत विषय मांडू.
या वेळी बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीतील कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त केली. तसेच मुंबईचा महापौर काँग्रेसचा झाला पाहिजे, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
चव्हाण म्हणाले, की भाजपला थांबवण्यासाठीच महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर चालेल. सोनिया-राहुल गांधी यांच्या विचार आणि भूमिकेवर सरकार चालेल. चव्हाण यांनी या वेळी शिवसेनेला अप्रत्यक्ष इशाराही दिला. भाजपचा सामना करायचा आहे हे विसरू नका. अन्यथा, दोन हात सामना आम्हीही करू. भाई जगताप तुम्ही दोन हात करायला कमी पडू नका, आम्ही ताकद देवू, असे ते म्हणाले.
-----