इस्लामपूर/प्रतिनिधी : वाळवा तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या घटत असताना रविवारी तांबवे येथील 10 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आह...
इस्लामपूर/प्रतिनिधी : वाळवा तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या घटत असताना रविवारी तांबवे येथील 10 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांची ऍटीजन टेस्ट घेतली असता त्यांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भिसे यांनी दिली.
कोरोनाची दाहकता कमी होत असताना तांबवे गावातील शनिवार, दि. 9 रोजी 62 वर्षाच्या वृध्दाचा कराड येथील खाजगी रुग्णालयात अँटीजन अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याला कृष्णा हॉस्पिटल कराड येथे कोव्हिड विभागात दाखल करून उपचार सुरु आहेत. त्यानंतर रविवारी त्या रुग्णाच्या संपर्कातील 29 जणांची अँटीजन टेस्ट केली असता 10 लोकांची अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामध्ये पाच महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे. यामुळे कासेगावसह तांबवे गावात खळबळ उडाली आहे. परिसरातील गावांमध्ये भितीचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. या प्रकाराने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. डॉ. निलेश पन्हाळे, डॉ. रुतूल रासकर यांनी तांबवे गावात भेट देऊन सबंधीत कोरोना बाधित कुटुंबाला सूचना दिल्या. तसेच येथून पुढे आरोग्याची योग्य ती काळजी घेतली तर कोरानाचा प्रसार थांबविणे शक्य होईल, असे आवाहन कासेगाव वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र भिसे यांनी केले आहे. तांबवे गावात ग्रामस्थांनी मास्कचा वापर करावा, कोरानापासून सुरक्षित रहावे, सोशल डिस्टीशनमध्ये रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी केले आहे.