लोणंद / वार्ताहर : शिरवळ, ता. खंडाळा येथील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा. म्हणून अर्धनग्न मोर्चा स्वरूपात आंदोलन दि. 11 जानेवारी रोजी क...
लोणंद / वार्ताहर : शिरवळ, ता. खंडाळा येथील स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा. म्हणून अर्धनग्न मोर्चा स्वरूपात आंदोलन दि. 11 जानेवारी रोजी करण्यात येत आहे. हे आंदोलन शिरवळ ते जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा पर्यंत सर्व आंदोलक हे चालत जाणार आहेत. याबाबतचे निवेदन ही जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. दरम्यान, मागील दोन वर्षापूर्वी महामार्गाच्या भूसंपादनाच्या संदर्भातील मागण्या मान्य होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी मंत्रालयावर अशाच प्रकारे अर्धनग्न मोर्चा काढला होता, त्याचीच आता पुनरावृत्ती होत असल्याने खंडाळा तालुक्यातील शेतकर्यांच्या मुलांना आता नोकर्याही मिळत नसल्याने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून असे म्हटलेले आहे की, शिरवळ परिसरामध्ये अनेक औद्योगिक कंपन्यामध्ये मोठया प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता व उपलब्धता असते. त्यानुसार स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. या शासनाच्या उद्देशानुसार स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अनेक उद्योगांमध्ये त्या संदर्भात निवेदने देऊन स्थानिक समानता साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार अनेक उद्योगांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. परंतू स्थानिक शिरवळ मधील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या स्वार्थापोटी व आडमुठ्या भूमिकेमुळे या उपक्रमाला गालबोट लागून सामाजिक शांतता धोक्यात आणण्याचे जोरदार प्रयत्न चालू आहेत. याचा निषेध करण्यासाठी व सत्य परिस्थिती सर्वांच्या समोर आणून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळावा. म्हणून शांततेच्या मार्गाने शिरवळ ग्रामपंचायती समोर सत्याग्रह उपोषण देखील केले. परंतू सत्याला वाचा न फुटल्याने शिरवळ व शिरवळ परिसरातील जनतेमध्ये असंतोष पसरला आहे.त्या असंतोषाचा उद्रेक होऊन सामाजिक शांततेचा भंग होऊ नये. म्हणून आम्ही सर्वजण आपणाकडे दि. 11 जानेवारी रोजी अर्धनग्न अवस्थेत (चड्डी बनियान आंदोलन) आपल्या कार्यालयाकडे स्थानिकांवर रोजगारांसाठी होणार्या अन्याया विरोधात आपणाकडे पायी चालत येत आहोत, असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे.
आपण या जिल्ह्याचे सर्वेसर्वा आहात या आशेपोटी आपणाकडे जे अधिकार आहेत. त्याचा सदुपयोग करून संबधित विषयात लक्ष घालून समाजातील काही पदाचा गैरउपयोग करणार्या समाजकंटकांना समाज उपयोगी कार्यात बाधा आणण्यापासून रोखावे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांच्याकडे व्यक्त करण्यात आली आहे. भारत देशामध्ये समाज सुधारणा त्याची प्रगती व्हावी. राहणीमान सुधारावे यासाठी स्थानिक संस्थांना अधिकार दिले गेले. परंतू त्या अधिकाराचा वापर समाजाला अधोगतीला नेण्याकडे होत असेल म्हणजेच कुंपणाचेच शेत खाण्यासारखे होईल व होत आहेत. हे असेच चालले तर आपल्या स्वप्नातील सुधारलेला समाज हा स्वप्नातच राहील तरीही आपण या विषयातील सत्यता पडताळुन त्वरित संबंधित संसंस्थेला तसेच उद्योगाला कार्यवाही करण्याचे आदेश घ्यावेत ही विनंती करण्यात आलेली आहे.
या निवेदनासोबत शिरवळ ग्रामसभेचा ठराव,3 फेब्रुवारी 2020 रोजी सर्वानुमते मान्य केलेला ठराव, 5 नोव्हेंबर 2020 रोजी केलेला सत्याग्रहाचे पडसाद व त्यावरील निर्णयाची प्रत, कंपनीला कामगारांनी दिलेल्या निवेदनाची प्रत, कंपनीकडून मिळालेल्या निर्णयाची प्रत आदी या विषयातील संबधित कागदपत्रे जोडण्यात आल्या आहेत.