मुंबई / प्रतिनिधीः बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पो...
मुंबई / प्रतिनिधीः बहुचर्चित टीआरपी घोटाळ्यातील आरोपी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलचे (बार्क) माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांनी मुंबई पोलिसांना दिलेल्या लेखी जबाबात दावा केला आहे, की रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामीकडून त्यांना 12 हजार डॉलर मिळाले होते. याशिवाय, दोन विशेष सुट्यांसह तीन वर्षांमध्ये त्यांना एकूण 40 लाख रुपये मिळाले, ज्यासाठी त्यांना रिपब्लिक वाहिनीच्या बाजूने रेटींगमध्ये फेरफार करायची होती. टीआरपीमध्ये फेरफार करण्याची ही माहिती पुरवणी आरोपपत्रातून मिळाली आहे.
मुंबई पोलिसांकडून 11 जानेवारी रोजी तीन हजार 600 पानांचे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ज्यामध्ये बार्क फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टचादेखील समावेश होता. याचबरोबर दासगुप्ता आणि गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सअप चॅटचादेखील समावेश आहे. याशिवाय बार्कचे माजी कर्मचारी आणि केबल ऑपरेटरसह 59 जणांच्या विधानांचा समावेश आहे. लेखा परीक्षणात अनेक न्यूज चॅनल, रिपब्लिक टीव्ही, टाईम्स नाऊ आणि आजतक साठी बार्कचे वरिष्ठ अधिकार्यांद्वारे कथित टीरआरीप फेरफार आणि रेटींगच्या फिक्सिंग बाबत सांगण्यात आलेले आहे. पार्थो दासगुप्ता, रोमील रामगढिया, विकास खनचंदानी यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सर्वात अगोदर 12 लोकांविरोधात नोव्हेंबरमध्ये आरोपपत्र दाखल कऱण्यात आले होते. दुसर्या आरोपपत्रानुसार दासगुप्ताचे म्हणणे क्राईम इंटेलिजन्स युनिटने नऊ नोव्हेंबर रोजी रेकॉर्ड केले होते. दासगुप्ताने सांगितले आहे, की मी अर्णब गोस्वामीला 2004 पासून ओळखतो. आम्ही टाईम्स नाऊ मध्ये सोबत काम करत होतो. मी बार्कचा सीईओ म्हणून 2013 मध्ये काम सुरू केले होते आणि अर्णब गोस्वामीने 2017 मध्ये रिपब्लिक चॅनल सुरू केले होते. रिपब्लिक चॅनल सुरू करण्याअगोदर त्याने माझ्याशी अनेकदा योजनेबाबत चर्चा केली होती व रेटींगसाठी मदत करण्याचेदेखील म्हटले होते. गोस्वमीला हे माहिती होते, की मला माहिती आहे टीआरपी प्रणाली कशाप्रकारे काम करते? टीआरपी वाढविण्यासाठी बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक वाहिनीचे गोस्वामी यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा गुन्हे शाखेने मागच्या महिन्यात न्यायालयात केला होता. पोलिसांना दिलेल्या जवाबात दासगुप्ता म्हणतात, की रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकची रेटींग मिळावी, यासाठी मी आपल्या टीम सोबत काम करायचो व टीआरपीमध्ये फेरफार करायचो. हे जवळपास 2017 पासून 2019 पर्यंत सुरू होते.2017 मध्ये अर्णबने मला माझ्या कुटंबासोबतच्या फ्रान्स व स्वित्झर्लंडच्या सहलीसाठी जवळपास सहा हजार डॉलर कॅश दिले. यानंतर 2019 मध्येदेखील त्यांनी मला तेवढीच रक्कम दिली. 2017 मध्ये देखील गोस्वामीने माझी भेट घेतली आणि मला 20 लाख रुपये कॅश दिले. 2018 व 2019 मध्ये त्यांनी मला प्रत्येक वेळी दहा लाख रुपये दिले.