अल्पावधीत महावितरणकडून वीजपुरवठा तोडण्याचे संकेत सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्...
अल्पावधीत महावितरणकडून वीजपुरवठा तोडण्याचे संकेत
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीज ग्राहक नियमित वीजबिलांचा भरणा करीत असल्याने तसेच बिलींग सायकलमुळे एरव्ही दरमहा 3 ते 4 कोटी रुपयांची थकबाकी दिसून येत होती. मात्र हीच थकबाकी आता तब्बल 148 कोटी 13 लाख रुपयांवर गेली असल्याने महावितरणच्या महसुली तुटमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे.
‘कोरोना’च्या गेल्या 10 महिन्यांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल 144 कोटी 94 लाखांनी वाढली आहे. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी महावितरणच्या कर्मचार्यांची रात्रंदिवस अविरत धडपड सुरु असते. त्यांनाच महावितरणच्या अस्तित्वासाठी नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागणार आहे. वीज ग्राहकांनी सहकार्य करून थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.
सातारा जिल्ह्यात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सुमारे 7 लाख 22 हजार ग्राहक आहेत. मार्च 2019 मध्ये 65 हजार 970 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे केवळ 3 कोटी 19 लाख रुपयांची थकबाकी होती. मार्च 2020 मध्ये 1 लाख 66 हजार वीज ग्राहकांकडे 21 कोटी 69 लाखांची थकबाकी होती. ही थकबाकी वसुल करण्यापूर्वी मार्चमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन सुरु झाला. तेव्हापासून वीजबिल वसुलीवर मोठा परिणाम सुरु आहे. अनलॉकनंतर थकीत व चालू वीजबिलांचा भरणा फारसा होत नसल्याने महावितरणची आर्थिक स्थिती सध्या हलाखीची झाली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये घरगुती, वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतील 3 लाख 22 हजार वीज ग्राहकांकडे तब्बल 148 कोटी 13 लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यात सर्वाधिक घरगुती 2 लाख 81 हजार 830 ग्राहकांकडे 99 कोटी 85 लाख, वाणिज्यिक 31 हजार 900 ग्राहकांकडे 32 कोटी 92 लाख तर औद्योगिक 4 हजार 390 ग्राहकांकडे 15 कोटी 36 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या डिसेंबर 2020 पर्यंत तब्बल 145 कोटींच्या थकबाकीचा डोंगर वाढला. तरीही महावितरणने कोणत्याही थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला नाही. मात्र, केवळ वीजबिलांच्या वसुलीवर आर्थिक भिस्त असणार्या महावितरणची स्थिती वीजखरेदी, दैनंदिन देखभाल व दुरुस्ती खर्च, कर्जांचे हप्ते, कंत्राटदारांची देणी, आस्थापनांचा खर्च भागविण्याइतपत सध्या राहिली नाही. त्यामुळे थकबाकीदारांना नियमाप्रमाणे नोटीस पाठवून नाईलाजाने वीजपुरवठा खंडित करण्याचा कटू कारवाई सुरु करण्यात येत आहे.
गेल्या 15 वर्षांमध्ये महावितरणकडून वीजटंचाईसह हानी, चोरी, वितरण यंत्रणेची दुरवस्था आदींवर प्रभावी उपाययोजना करून संपूर्ण राज्य भारनियमनमुक्त करण्यात आले आहे. देशात सर्वाधिक विजेची मागणी असणारे व सुमारे 23 हजार 700 मेगावॉट विजेची मागणी पूर्ण करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. जागतिक तंत्रज्ञानाच्या ग्राहकसेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. राज्यातील जनतेच्या मालकीच्या महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात पूर्वीचा नावलौकीक मिळविला आहे. वीजबिलांच्या तक्रारी असल्यास त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.