नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व नवी मुंबईतून ...
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व नवी मुंबईतून अधिकाधिक गुणवंत खेळाडू निर्माण होऊन शहराच्या नावलौकिकात लक्षणीय भर पडावी यादृष्टीने "विविध खेळांचे क्रीडा प्रशिक्षण", जिल्हास्तरावरील शालेय क्रीडा स्पर्धा", "महापौर चषकांतर्गत विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा" असे नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून महानगरपालिका कार्यक्षेत्रातील रहिवाशी खेळाडूंना शालेय तसेच शासन मान्यताप्राप्त खेळांच्या संघटनेव्दारे आयोजित "राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा" व "राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा" यामध्ये प्राविण्यप्राप्त केलेल्या खेळांडूना अधिकाअधिक प्रोत्साहन देण्याकरीता महापालिका सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने "क्रीडा शिष्यवृत्ती" लागू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सन 2019-2020 मधील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना ही क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. "क्रीडा शिष्यवृत्ती" करिता पात्र असलेल्या खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्ज व इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता 15 फेब्रुवारीपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा विभागाकडे सादर करावी, असे जाहीर आवाहन क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी. विहित नमुन्यातील अर्ज राजीव गांधी क्रीडा संकुल, सेक्टर 3 ए, सीबीडी बेलापूर येथील क्रीडा विभाग कार्यालयात (दूरध्वनी क्र.27573294) तसेच www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी नवी मुंबईतील पात्र खेळाडूंनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.