कराड / प्रतिनिधी : कोरोना संक्रमणामुळे अनेक संस्थांना यंदाचे वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीचे गेले. या काळात अनेक कंपन्या व संस्था डबघाईला...
कराड / प्रतिनिधी : कोरोना संक्रमणामुळे अनेक संस्थांना यंदाचे वर्ष आर्थिकदृष्ट्या अत्यंत हलाखीचे गेले. या काळात अनेक कंपन्या व संस्था डबघाईला आल्याने, या कंपन्यांतील कर्मचार्यांवर बेकारीची वेळ आली. अनेक बँकांचे विलीनीकरण तर सहकारात काही बँका बंद पडल्याचीही उदाहरणे आहेत. पण अशा या संकटाच्या काळात कृष्णा सहकारी बँकेने मात्र आपल्या कर्मचार्यांना सरासरी 20 टक्क्यांची भरघोस पगारवाढ देत, कर्मचार्यांचे हित जपले आहे. कोरोनाच्या संकट काळातही कृष्णा बँकेची कर्मचार्यांचे हित जोपासणारी ही अनोखी कृती सहकार क्षेत्रात आदर्शवत ठरली असून, याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
कृष्णाकाठच्या ग्रामीण भागाची मुख्य अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्या कृष्णा सहकारी बँकेने कोरोना काळातही नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली आहे. कोरोना काळात आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी बँकेचे कर्मचार्यांनी मोठे साहस दाखविले. या काळात नियमित बँक सुरू ठेऊन ग्राहकांना ठेवींसह अन्य सुविधा देत, बँकेने लोकांना मोठा आर्थिक आधार मिळवून दिला. बँकेच्या कर्मचार्यांनी कोरोना काळात दिलेल्या या योगदानाची दखल घेत, बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी सरासरी 20 टक्क्यांची भरघोस पगारवाढ देण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या कर्मचारी संवाद मेळाव्यात जाहीर केला.
पारदर्शी कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवा यासाठी सुप्रसिद्ध असलेल्या कृष्णा सहकारी बँकेने यंदा सुवर्णमहोत्सवी 50 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त सहकार महर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या 96 व्या जयंतीचे औचित्य साधून बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी बँकेसह जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्था आणि कृष्णा महिला सहकारी पतसंस्था या तिन्ही संस्थांतील कर्मचार्यांशी संवाद साधला. याप्रसंगी व्यासपीठावर कृष्णा बँकेचे उपाध्यक्ष दामाजी मोरे, स्व. जयवंतराव भोसले पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, कृष्णा महिला पतसंस्थेच्या चेअरमन अलका जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. कापसे, अरूण यादव, नितीन देसाई प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की आप्पासाहेबांनी या भागातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि लोकांना बचतीची सवय लागावी यासाठी 50 वर्षांपूर्वी कृष्णा बँकेची स्थापना केली. या 50 वर्षांच्या काळात बँकेला अनेक संघर्षातून जावे लागले. पण सभासदांचा अढळ विश्र्वास आणि सेवकांचे भक्कम पाठबळ या जोरावर बँकेने देदीप्यमान कामगिरी केली. ग्रामीण बँक म्हणून स्थापन झालेल्या कृष्णा बँकेने 600 कोटी रूपयांहून अधिक रक्कमेचा एकत्रित व्यवसाय केला आहे. 21 डिसेंबर 2020 अखेर बँकेकडे 403 कोटी 38 लाख रूपयांच्या ठेवी आहेत. तसेच बँकेने 235 कोटी 96 लाख रूपयांची कर्जे वितरित केली असून, नेट एनपीए शून्य टक्के राहिला आहे. येत्या 2 वर्षात बँक 1000 कोटींचा व्यवसाय टप्पा पार करेल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी कृष्णा बँकेचे संचालक हेमंत पाटील, ऍड. विजयकुमार पाटील, तातोबा थोरात, महादेव पवार, पतसंस्थेचे संचालक वसीम मुल्ला, हरिभाऊ पाटील, मार्केटींग विभागप्रमुख सिध्दार्थ चक्रवर्ती, उपव्यवस्थापक गणपती वाटेगावकर, भगवान जाधव, विजय सातारकर उपस्थित होते. सी. एन. कापसे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. पोपटराव देसाई यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत पाटील यांनी आभार मानले.