पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर 3 देशांना कोव्हिशिल्ड लसीचे डोस निर्यात केले आहेत. सीरमचे सीईओ अदर पुनाव...
पुणे : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर 3 देशांना कोव्हिशिल्ड लसीचे डोस निर्यात केले आहेत. सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या एका इमारतीला गुरुवारी आग लागली होती. या दुर्घटनेत 5 कामगारांचा मृत्यू झाला.
सुदैवाने या आगीमुळे 'कोव्हिशिल्ड' लस निर्मितीच्या उत्पादनावर कुठलाही परिणाम झालेला नाही. या अग्नि दुर्घटनेनंतर आज, शुक्रवारी सीरम इन्स्टिट्यूटने म्यानमार, सेशेल्स आणि मॉरिशेस या देशांना 'कोव्हिशिल्ड' लसीचा साठा पाठवून दिला. यासंदर्भात ट्वीटर द्वारे माहिती देताना कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांनी सांगितले की, सर्व सरकारी संस्था आणि लोकांना मी हे निश्चितपणे सांगू शकतो की कोव्हिशिल्डच्या निर्मितीला कोणताही फटका बसलेला नाही. कोव्हिशिल्डची निर्मिती अनेक इमारतींमध्ये केली जाते. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये अशी एखादी घटना घडलीच तर लस सुरक्षित रहावी म्हणून मी मुद्दाम अशाप्रकारची रचना करुन ठेवली आहे, अशी माहिती देत त्यांनी पुणे पोलीस आणि अग्निशमन दलाचे आभार मानले आहेत.