मुंबई/प्रतिनिधीः पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेच...
मुंबई/प्रतिनिधीः पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्यातील आरोपी प्रवीण राऊत याच्या पत्नीकडून घेतलेले 55 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी परत केले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर राऊत यांनी हे पैसे परत केले आहे; मात्र तरीदेखील ईडी पुन्हा वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स पाठवू शकते. कारण 55 लाखांचा वापर त्यांनी केला आणि त्यानंतर त्यांनी परत केले आहेत.
वर्षा राऊत यांनी एका नातेवाइकाच्या माध्यमातून ईडीला काही कागदपत्रे सादर केली आहेत. त्यात प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले कर्ज परत केल्याचीही कागदपत्रे आहेत. संजय राऊत यांनी निर्मिती असलेल्या ’ठाकरे’ या चित्रपटातून मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी हे पैसे परत केले आहेत. वर्षा राऊत या ’ठाकरे’ चित्रपटाच्या सहनिर्मात्या आहेत. पंजाब, महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा आणि एचडीआयएल कर्ज घोटाळ्याची चौकशी करणार्या ईडीने नोव्हेंबर महिन्यात वर्षा राऊत यांना चारदा समन्स बजावले होते;मात्र तरीदेखील ईडीसमोर वर्षा हजर झाल्या नाहीत. 29 डिसेंबर रोजी त्यांनी ईडीकडून अधिक वेळ मागितली होती. त्यानुसार त्या पाच जानेवारी रोजी हजर राहणार होत्या; मात्र एक दिवस आधीच त्या ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या होत्या. आता वर्षा राऊत यांनी पाठवलेल्या कागदपत्रांची ईडीकडून छाननी सुरू असून आवश्यकता भासल्यास त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले जाणार आहे. पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेला गंडा लावून एचडीआयएलने बळकावलेले 95 कोटी प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून वळवल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत हा एचडीआयएलची उपकंपनी असलेल्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचा माजी संचालक आहे. तसेच ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे. ईडीच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत याने 95 कोटींपैकी एक कोटी 60 लाख रुपये आपल्या पत्नीच्या खात्यावर ट्रान्सफर केले होते. त्यातील 55 लाख पुढे वर्षा राऊत यांना देण्यात आले होते.