अहमदनगर / प्रतिनिधी: ’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत नगरच्या पोलिस दलाने यशस्वी कामगिरी केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 200 लहान मुलांच्या अपहरणाच्या ग...
अहमदनगर / प्रतिनिधी: ’ऑपरेशन मुस्कान’ अंतर्गत नगरच्या पोलिस दलाने यशस्वी कामगिरी केली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 200 लहान मुलांच्या अपहरणाच्या गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 77 बालकांचा शोध घेण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही माहिती दिली.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, आयपीएस अधिकारी आयुष नोपानी, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव, नोडल अधिकारी पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार, पोलिस निरीक्षक राम ढिकले, सुनील गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते. ’लहान मुले हरवल्याबाबतचे गुन्हे वगळले, तर जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार 301 व्यक्ती हरवलेल्या होत्या. त्यापैकी एक हजार 11 व्यक्तींचा शोध ऑपरेशन मुस्कान अंतर्गत घेतलेला आहे. एक हजार 210 महिलांपैकी 621 व एक हजार 91 पुरुषांपैकी 390 जणांचा शोध घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात एक डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये शोध घेताना रेकॉर्ड बाहेरील 47 मुले आढळून आली आहेत. त्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. घरातून निघून गेलेली, त्रासाला कंटाळून घराबाहेर गेलेली ही मुले पुन्हा कुटुंबात सुखरूप परतल्यानंतर सर्वांच्या चेहर्यावर हास्य फुलले, असेही पाटील म्हणाले. बाजीराव पोवार, सोमनाथ कांबळे, अर्चना काळे, रीना म्हस्के, मोनाली घुटे, छाया रांधवण, रुपाली लोहारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. संगमनेर शहरातील निराधार महिला रस्त्यावरून जात असताना मुस्कान पथकाने तिची चौकशी केली. तेव्हा तिच्या मानसिक स्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्यावर कोणीतरी अत्याचार केल्याचे पथकाच्या लक्षात आले व ती गरोदर असल्याचे आढळून आले. या वेळी पोवार व त्यांच्या सहकार्यांनी संबंधित महिलेला रुग्णालयात नेले व दोन आठवड्यांनंतर तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचे नाव दिगंबर असे ठेवले आहे,’ अशी माहितीही या वेळी देण्यात आली.