विजयी होऊन त्यांची टोपी निघू देणार नाही पुणे/प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार टो...
विजयी होऊन त्यांची टोपी निघू देणार नाही
पुणे/प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार टोले लगावले. सत्तार यांच्या संकल्पाची आठवण करून देत सातत्याने निवडून येऊन सत्तार यांच्या डोक्यातील टोपी निघू देणार नाही, अशा शब्दांत दानवे यांनी सत्तार यांचा समाचार घेतला. सत्तार यांनी आधी मला पाडल्याशिवाय डोक्यावरील केस वाढवू देणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे मी त्यांचे खरे तर केसच उगवू देणार नव्हतो, असा टोला दानवे यांनी या वेळी लगावला.
दानवे म्हणाले, की सत्तार यांचे पहिले वक्तव्य रावसाहेब दानवे यांना पाडल्याशिवाय डोक्यावर केस उगवू देणार नाही असे होते, तरीही मी निवडून आलो. त्यानंतर आता त्यांनी ‘पण’ केला, की दानवे यांना पाडल्याशिवाय टोपी घालणार नाही. सत्तार माझे चांगले मित्र आहेत. बिचारे ते इतके बोलतात; पण निवडणूक आली की माझेच काम करतात. त्यांच्या तालुक्यात माझी आणि माझ्या तालुक्यात त्यांची सासुरवाडी आहे; पण मी त्यांची टोपी कधीच निघू देणार नाही. चिंता करू नका. खरे तर केसच उगवू देणार नव्हतो; पण आता त्यांनी टोपी घातली, असेही दानवे म्हणाले. राज्य सरकार ज्या भावनेने काम करत आहे, ज्या भावनेने त्याकडे बघत आहे, यामागे त्यांचा उद्देश काय आहे मला माहित नाही. आमच्या सगळ्यांच्या सुरक्षा हटवल्या, तरी आम्ही त्याबद्दल सरकारकडे दाद मागणार नाही. आमचे संरक्षण केवळ पोलिस करतात असे नाही. आमचे संरक्षण या राज्यातली जनता करते. त्यामुळे सुरक्षा हटवली, तर आमच्या कामात कमीपणा येईल किंवा आम्ही हादरून जाऊ, असे होणार नाही, असे ते म्हणाले. आमची सुरक्षा का हटवली हे त्यांनाच विचारले पाहिजे. पोलिस संरक्षण देते तेव्हा ते सरकार देत नसते. यासाठी सरकारने नेमलेली एक समिती असते. ती समिती आढावा घेते. मग यांना काही धोका आहे का, याचा अहवाल पोलिस देतात. त्यानंतरच संरक्षण मिळते. आमच्या सुरक्षेत कपात केली; पण आम्हाला काही चिंता नाही. आमचा काही आक्षेप नाही, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली.