मुंबई / प्रतिनिधी: केंद्राकडून कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर भारतातील सीरम इनस्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्यामध्ये वाद निर्माण...
मुंबई / प्रतिनिधी: केंद्राकडून कोरोना लसीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर भारतातील सीरम इनस्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. अदर पूनावाला यांनी नाव न घेता भारत बायोटेकला टोला लगावला होता. त्यानंतर भारत बायोटेकनेही सीरमला प्रत्युत्तर दिले; मात्र आता दोन्ही संस्थांनी वादावर पडदा टाकला असून कोरोना लसीकरणासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला आहे.
सीरम इनस्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून संयुक्त प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. सीरमकडून अदर पूनावाला आणि भारत बायोटेकचे डॉ .कृष्णा एल्ला यांनी दोन्ही संस्थांच्या लसीला मंजुरी देण्यात आल्याचे स्वागत केले. दोन्ही लसींचा वापर जगातील नागरिकांसाठी केला जाईल, असे म्हटले आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात लसीची निर्मिती आणि पुरवठा कसा करायचा, हे आव्हान दोन्ही संस्थांपुढे आहे. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी दोन्ही संस्था काम करत आहेत. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराला भारतात मंजुरी देण्यात आली आहे. आता दोन्ही संस्था कोरोना लसींच्या निर्मितीवर लक्ष देतील आणि एकत्रितपणे काम करतील, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कोरोना लसीची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. मोठ्या लोकसंख्येला उच्च प्रतींच्या लसींचा पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यावरच दोन्ही संस्थांचे लक्ष आहे. प्रसिद्धीपत्रकात दोन्ही कंपन्यानी एकमेकांच्या कामाचे कौतुक केले आहे. दोन्ही संस्थामंध्ये गैरसमजुतीने वाद निर्माण झाला होता. त्यावर पडदा टाकण्यात आला आहे.पूनावाला यांनी कोविशील्डच्या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर जगात फक्त फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड अॅस्ट्राजेनेका यांच्या लसींच फक्त उपयुक्त आहेत, इतर लसी पाण्यासारख्या आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर भारत बायोटेकने त्यांची भूमिका जाहीर केली होती.