बी. जी. कोळसे पाटील यांची घोषणा; परवानगी नसली, तर मैदानात परिषद पुणे / प्रतिनिधीः राज्यात कोरोनाचा संसर्ग असून अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिक...
बी. जी. कोळसे पाटील यांची घोषणा; परवानगी नसली, तर मैदानात परिषद
पुणे / प्रतिनिधीः राज्यात कोरोनाचा संसर्ग असून अशा परिस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमवू नये, असे सरकारचे आदेश आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक कार्यक्रमांनादेखील मनाई करण्यात आली असताना एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पुण्यात तीस तारखेला एल्गार परिषद होणारच, अशी घोषणा केली आहे.
पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले. राज्य सरकारने सभागृहात परवानगी दिली नाही, तर एल्गार परिषद रस्त्यावर घेऊ, असा कोळसे पाटील यांनी दिला. शेवटी जेलभरोची आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की यापूर्वी एक जानेवारीला पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषद होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, अशी मागणीही स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली होती; परंतु परिषदेला परवानगी नाकारण्यात आली.
अन्न वस्त्र, निवारा यासोबतच आरोग्य शिक्षण याभोवती राजकारण फिरायला हवे; मात्र हिंदू-मुस्लिम, लव्ह-जिहाद, जात-पात- धर्मानुसार राजकारण फिरत आहे. याचा लढा आम्ही अनेक वर्षांपासून करत आलो आहोत. यापुढेही तो कायम राहील. लोकशाहीवादी, आंबेडकरवादी युवावर्गच पुढे येऊन काम करत असल्याचे सांगून ते म्हणाले, की संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे आणि देवेंद्र फडणवीस यांचे एकत्र फोटो दाखवतो. सरकार कुणाचेही आले तरी बाटली जुनी आहे. पाणी नवीन आहे. कुठलेही सरकार आले, तरी मनुवादी विचाराने बुरसटलेलेच आहे, अशी टीका कोळसे पाटील यांनी या वेळी केली.
राज्यात नवीन सरकार आले आणि त्यांनी माझे संरक्षण काढून घेतले. ज्या संस्थांवर लोकशाही अवलंबून त्या कशा काम करतात, हे मला माहिती आहे. देशात जाती धर्माची कीड लागली त्यातून कसा बाहेर निघणार हा प्रश्न आहे, अशा शब्दांत कोळसे पाटील यांनी चिंता व्यक्त केली. दरवर्षी 31 डिसेंबरला आम्ही एल्गार परिषद घेत असतो. त्याचा मी संयोजक आहोत आणि राहणार. एल्गार परिषदेला आमचा एकही पैसा लागला नाही. आमच्यावर बंधने घातली, खोटे आरोप केले. मूलभूत सुविधांबरोबर आरोग्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी एल्गार परिषदचे आयोजन करत आहे, अशीही माहिती कोळसे पाटील यांनी दिली.