कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यांच्या विधानाला अजित पवार आ...
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यांच्या विधानाला अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पाठिंबा दिला असतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र, चिमटा काढलाय. "मला देखील मुख्यमंत्री व्हावेसे वाटते, करणार कोण" अशी मिश्किल प्रतिक्रिया पवार यांनी कोल्हापुरात दिली.
सांगलीतील इस्लामपूर येथे एका प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले होते की, दीर्घकाळ राजकारणात काम करणा-या कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटेल. मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे. परंतु, शरद पवारांचा निर्णय हा आमच्या दृष्टीने अंतिम आहे, असे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले होते. जयंत पाटील यांच्या विधानानंतर राजकारण ढवळून निघालेय. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जयंत पाटील यांच्या इच्छेला सकारात्मकता दर्शवली असतानाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. कोल्हापूर भेटीवर असलेल्या पवार यांना जयंत पाटील यांच्या मनोदयाबाबत विचारले असता पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. जयंत पाटील यांना शुभेच्छा देताना म्हंटले की, उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावे, कोणी करणार का..? असा टोला पवार यांनी लगावला. दरम्यान जयंत पाटील यांनी आपल्या विधानाचा विपर्यास झाल्याची प्रतिक्रिया दिलीय. तसेच महाविकास आघाडीत सर्व पक्ष एकदिलाने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.