केरळमध्ये संचारबंदी; मांस, अंडी विक्रीची दुकाने बंद तिरुवनन्तपूरम: कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवे संकट उभे...
केरळमध्ये संचारबंदी; मांस, अंडी विक्रीची दुकाने बंद
तिरुवनन्तपूरम: कोरोनाच्या संकटातून संपूर्ण देश बाहेर पडत असताना आता आणखी एक नवे संकट उभे ठाकले आहे. देशातील अनेक राज्यात बर्ड फ्ल्यूने डाके वर काढले आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळात बर्ड फ्ल्यूने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे या राज्यांनी अति दक्षतेचा इशारा दिला आहे. केरळने तर बर्ड फ्लूला राज्य आपत्ती म्हणून घोषित केले आहे.
केरळमध्येही बर्ड फ्लूचा कहर वाढल्याने अति दक्षतेचा आदेश देण्यात आला आहे. कोट्ट्यम आणि अलाप्पुझा जिल्ह्यात खासकरून बर्ड फ्लूूचा कहर वाढला आहे. बर्ड फ्लूचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या परिसरापासून एक किलोमीटर क्षेत्रातील बदक, कोंबड्या आणि पाळीव पक्ष्यांना मारण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. एन 5, एन 8 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नाइलाजाने हे पाऊल उचलावे लागत असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. कोट्टायम जिल्ह्यातील नीदूर येथे बदक पालन केंद्रातील दीड हजार पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. बर्ड फ्लूची साथ ही अत्यंत वेगाने पसरते. एन 5, एन 8 विषाणूमुळे पक्ष्यांच्या श्वसनयंत्रणेत बिघाड होऊन त्यांचा मृत्यू होतो. माणसांनाही याची लागण होऊ शकते.
केरळमध्ये यंदा तब्बल 50 हजार स्थलांतरित पक्षी दाखल झाले आहेत. यापैकी काही पक्ष्यांचा मृत्यू झाला असून त्यांची तातडीने विल्हेवाट लावण्यात आली. राज्यातील इतर पाणथळ प्रदेशांत पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अजूनतरी समोर आलेली नाही; मात्र केरळमध्ये वन्यजीव आणि पशुपालन विभागाच्या अधिकार्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2016 मध्ये केरळमध्ये बर्ड फ्लूची मोठी साथ आली होती. मध्य प्रदेशात 23 डिसेंबरपासून ते तीन जानेवारीपर्यंत 376 कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील सर्वाधिक म्हणजे 142 कावळे इंदूरचे आहेत. त्याशिवाय मंदसौरमध्ये 100, आगर-मालवामध्ये 112, खरगोन जिल्ह्यात 13, सीहोरमध्ये नऊ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या कावळ्यांचे नमुने चाचणीसाठी भोपाळला पाठवण्यात आले आहेत. इंदूर आणि मंदसौरमध्ये पाठवण्यात आलेल्या नमुन्यातून हा बर्ड फ्लू असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंदसौर येथे चिकन आणि अंड्यांची दुकाने बंद करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत
चौकट
हिमाचल प्रदेशात स्थलांतरित पक्ष्यांचा मृत्यू
मध्य प्रदेश आणि केरळपुरतीच ही साथ मर्यादित नाही. राजस्थान आणि गुजरातमध्येही कावळ्यांच्या मृत्यूचे प्रमाण जादा आहे. हिमाचल प्रदेशात तर स्थलांतरित पक्ष्यांच्या मृत्यूंची संख्या हजारोत आहे.