मुंबई /प्रतिनिधी: मागील 29 दिवस इंधन दर स्थिर ठेवणार्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल 26 पैशांनी महा...
मुंबई /प्रतिनिधी: मागील 29 दिवस इंधन दर स्थिर ठेवणार्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली. आज पेट्रोल 26 पैशांनी महागले, तर डिझेल दरात 25 पैसे वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीने मुंबईत पेट्रोल 90.60 रुपये झाले आहे, तर एक लीटर डिझेलसाठी ग्राहकांना 80.78 रुपये मोजावे लागतील.
आज सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीत तेजी दिसून आली. डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव प्रतिपिंप 0.06 डॉलरने वधारला आणि 49.84 डॉलर झाला. ब्रेंट क्रूडचा भाव 2.51 डॉलरने वाढला असून तो 53.60 डॉलर झाला आहे. तेलाच्या दरात 4.91 टक्के वाढ झाली आहे. दरम्यान, अमेरिकेतील तेल साठा एक जानेवारीच्या आठवड्यात 12 लाख सत्तर हजार पिंप इतका आहे. त्याआधीच्या आठवड्यात तो 47 लाख 80 हजार पिंप होता. मागील काही आठवडे तेलाची मागणी वाढत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तेलाच्या दरात तेजी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे; मात्र नव्या कोरोना विषाणूने युरोपात आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. ब्रिटनने टाळेबंदी जाहीर केली असून त्यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.