व्हाइट हाऊसमधील तीन व्यक्तींनी दिले राजीनामे वॉशिंग्टन : 2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अद्य...
व्हाइट हाऊसमधील तीन व्यक्तींनी दिले राजीनामे
वॉशिंग्टन : 2020 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या निकालावर अमेरिकेत अद्यापही राजकीय तणाव सुरुच आहे. दरम्यान निवडणूक निकालांबाबत अमेरिकेच्या संसदेची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत जो बायडन यांच्या विजयाची घोषणा केली जाणार होती. मात्र, त्याचवेळी ट्रम्प यांच्या समर्थकांनी वॉशिंग्टनमधील कॅपिटॉल इमारतीत घुसून गोंधळ घातला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या झटापटीत एका आंदोलनकर्त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान अमेरिकन संविधानातील २५ व्या दुरुस्तीबद्दल चर्चा झाली. राष्ट्राध्यक्ष योग्य पद्धतीने आपले कर्तव्य बजावत नसेल, तर संविधानातील २५ वी दुरुस्ती उपराष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळाला राष्ट्राध्यक्षाला पदावरुन हटवण्याचा अधिकार देते. ट्रम्प नियंत्रणाबाहेर गेले आहेत. त्यामुळे २५ व्या दुरुस्तीच्या वापराबद्दल चर्चा झाली असे एका रिपब्लिकन नेत्याच्या हवाल्याने सीएनएनने म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. पण ट्रम्प हा पराभव मान्य करायला तयार नाही. निवडणुकी प्रक्रियेत काहीतरी गडबड झाल्याचा त्यांचा दावा आहे. ट्रम्प यांनी अजूनही आपला पराभव मान्य केलेला नाही.
तीन व्यक्तींनी दिले राजीनामे
कॅपिटॉल इमारत परिसरातील घडामोडींनंतर अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅट पॉटिंगर, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ स्टेफनी ग्रीशम आणि व्हाइट हाऊसचे उप प्रेस सचिव सारा मॅथ्यूज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. स्टेफनी ग्रीशम यांनी व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव पदाची जबाबदारी सुद्धा संभाळली आहे. त्यांनी सर्व प्रथम राजीनामा दिला.