पुणे /प्रतिनिधी: कोरोना आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे विविध शहरातील जवळपास सर्वोच उद्योग-व्यवसाय बंद होते. त्यामुळे महापाल...
पुणे /प्रतिनिधी: कोरोना आणि त्यानंतर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे विविध शहरातील जवळपास सर्वोच उद्योग-व्यवसाय बंद होते. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली; पण अनलॉकनंतर पुणे महापालिकेला मोठे उत्पन्न मिळाले आहे. पुणे महापालिकेला मिळकतकरातून पहिल्यांदाच एक हजार तीनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. महत्वाची बाब म्हणजे कोरोनाच्या प्रादुर्भावातही पुणेकरांनी पहिल्यापासून महापालिकेचा कर भरण्यास प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतानाही मार्च ते सप्टेंबर या पहिल्या सहा महिन्यात महानगरपालिकेला साडेआठशे कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. त्याचबरोबर पुणे महापालिकेने थकबाकीदारांसाठी जाहीर केलेल्या अभय योजनेमुळे दोन महिन्यात महापालिकेच्या उत्पन्नात अजून साडेतीनशे कोटी रुपयांची भर पडली आहे. जवळपास 18 हजार नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मागील एका महिन्यात 70 कोटी रुपयांची भर पुणे महापालिकेच्या तिजोरीत पडली आहे. यापूर्वी संपूर्ण आर्थिक वर्षात महापालिकेला मिळालेले सर्वाधिक उत्पन्न एक हजार 262 कोटी रुपये होते; पण यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावातही पुणे महापालिकेला एक हजार तीनशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणे, मुखपट्टी न वापरणे आणि रस्त्यांवर थुंकणार्यांकडून 18 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, याबाबत प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना देण्यात येतात, तरीही लाखो लोक बेशिस्तपणे वर्तणूक करताना पाहायला मिळतात. पुणे महापालिका प्रशासनाकडून बेशिस्तपणे वागणार्या जवळपास दोन लाख 71 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सुमारे 18 कोटी 64 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणारे सर्वाधिक लोक हे ग्रामीण भागातील आहेत आणि त्याखालोखाल पुणेकरांचा नंबर लागतो.