मुंबई : राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप त...
मुंबई : राज्यातील शाळांच्या गुणवत्तेचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यासाठी लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी करून राज्यातील शालेय शिक्षणाचा रोड मॅप तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ असे सादरीकरण शालेय शिक्षण विभागाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे संचालक राहुल द्विवेदी, परीक्षा मंडळाचे संचालक दिनकर पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्याचे शालेय शिक्षणाचे व्हिजन तयार करीत असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर अधिक लक्ष देण्यात यावे. आताच्या काळात व्यावसायिक शिक्षण महत्त्वपूर्ण ठरतअसल्याने विद्यार्थ्यांना आठवीपासूनच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात यावे. शैक्षणिक आणि पायाभूत सुधारणा करण्यासाठी दरवर्षाचा कार्यक्रम तयार करावा आणि त्यासाठी दरवर्षी किती निधी लागेल याप्रमाणे तरतूद करण्यात यावी. राज्यातील शाळांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणे महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शाळांमध्ये फेजवाईज इंटरनेट सुविधा उपलब्ध करून द्यावी. मुलांना सध्याच्या शिक्षण पद्धती बरोबरच नैसर्गिकरित्याही शिक्षण घेता येईल का, या पद्धतीने शाळेची रचना करावी. यासाठी बोलक्या भिंती यासारखे उपक्रम राबवता येतील का हे सुध्दा पाहण्यात यावे. शालेय शिक्षण विभागाच्या व्हिजननुसार काम करताना तातडीने हाती घ्यावयाची कामे आणि दीर्घकालीन कामे याचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, तसेच या क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत शालेय विकासासाठी काय करता येईल आणि त्यांना शासनाबरोबर कसे जोडले जाईल यासाठी विभागाने प्रयत्न करावा असेही ठाकरे यांनी यावेळी सांगितले.