अहमदनगर /प्रतिनिधीः साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोडीसाठी बहुतांश मजुरांनी स्थलांतर केले आहे. ऊसतोड मजुरांची मुले शाळांनी चा...
अहमदनगर /प्रतिनिधीः साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याने ऊसतोडीसाठी बहुतांश मजुरांनी स्थलांतर केले आहे. ऊसतोड मजुरांची मुले शाळांनी चालू केलेले ऑनलाईन शिक्षण सोडून पालकांसोबत उसाच्या फडात राबत आहेत. कोरोना संसर्गामुळे शाळा बंदच होत्या. दरम्यान, शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्यानंतर परिस्थितीत थोडू सुधारणा झाल्यावर नववी ते बारावी वर्ग सुरू केले; मात्र पहिली ते आठवी वर्गांचे अद्यापही नियमित वर्ग सुरू झालेले नाहीत. ते कधी सुरू होतील, याची शाश्वती नाही. त्यांचे ऑनलाईन शिकविणे चालू असले, तरी ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणाकडे पाठ फिरवून त्यांच्या पालकांना उसतोडीसाठी उसाच्या फडात काम करताना दिसत आहेत. दुष्काळी भागातील ऊसतोड मजूर कुटुंबीयांसह पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोडीला आले आहेत. अनेक ऊसतोड मजूर कुटुंबे शाळेत जाणार्या मुलांना सोबत घेऊन ऊसतोड करीत आहेत. ऊसतोडीसाठी पालकच घराबाहेर पडल्यामुळे तसेच या वर्षी कोरोनामुळे शाळा व आश्रमशाळाही बंद असल्याने या मुलांचा गावात कोण सांभाळ करणार, असा प्रश्न पडल्यामुळे अनेक मजुरांनी मुलांना सोबत आणले आहे.
उसाच्या फडात आठवी ते पाचवीतील मुले ऊसतोड करताना आढळली. बालमजूर कायदा अस्तित्वात आहे, की नाही, याची त्यांना गंधवार्ताही नाही. नगर, बीड, जालना, जळगाव जिल्ह्यातील ऊसतोड मजूरांची मुले शिक्षण सोडून लहान बहीण-भावंडांचा सांभाळ करीत आहेत किंवा उसाच्या फडात पालकांना मदत करीत आहेत. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाची संधी निर्माण व्हावी, यासाठी कारखाना परिसरात साखरशाळा सुरू करण्याचा निर्णय साखर संचालक व शासनाने घेतला होता; मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून साखर शाळा बंद आहेत. त्यापुन्हा सुरू होऊन ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. खरीपातील पेरणी, मुला-मुलींचे लग्न व देणेदाराची देणी देण्यासाठी मुकादमाकडून अनेकांनी घेतलेली उचल फेडण्यासाठी तसेच पोटासाठी शिकणार्या मुलांना घेवून ऊसतोड करावी लागते, अशी ऊसतोड मजुरांची व्यथा आहे. महाराष्ट्रात सुमारे 12 लाख ऊसतोडणी मजूर आहेत. त्यांच्या तेवढ्याच मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. स्वंयसेवी संस्थांनी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली, तर भावी काळात त्यांना कोयता हाती धरावा लागणार नाही.