काही लोकांना पदाची भारी हौस असते. पदं मिळविण्यासाठी ते कोणत्याही थराला जात असतात. काही व्यक्ती मात्र पदाच्या मागं धावत नाहीत, तर पदं त्यांच्...
काही लोकांना पदाची भारी हौस असते. पदं मिळविण्यासाठी ते कोणत्याही थराला जात असतात. काही व्यक्ती मात्र पदाच्या मागं धावत नाहीत, तर पदं त्यांच्या मागं येत असतात. अशा व्यक्ती पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत असतात; परंतु त्यांच्या विरोधकांना ते सहन होत नाही. त्यांनी विष पेरलं, की पदाचा सोस नसलेल्यांच्या अंगाची लाही लाही होत असते. बाळासाहेब थोरात त्यापैकीच एक. संयमी असले, तरी त्यांच्या संयमाचा अंत पाहण्याचं काम अनेक जण करीत असतात. त्यामुळं बाळासाहेबांवर कोणत्या पदाची मज नाही हाव म्हणण्याची वेळ येते.
सर्वही कामांचा पाठीवरी भार।
... श्रेष्ठ कोणत्या पदाची मज नाही हाव।
तू माझा भाव आवडावा ॥ ...
हा विष पेरितोच अंगी ।
आग आग होई पहा सोसवेना॥ ..
हे संत वचन बाळासाहेब थोरात यांना तंतोतंत लागू पडतं. त्यांची सध्याची अवस्था या संत वचनाप्रमाणं झाली आहे.
प्रतिकूल परिस्थितीत नेतृत्व करायला कुणीच पुढं यायचं नाही आणि परिस्थिती थोडी अनुकूल झाली, की नेतृत्वाची माळ गळ्यात कशी पडेल, यासाठी धडपड करायची, ही काँग्रेसजणांची वृत्ती आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अवघी एक जागा जिंकून आणता आलेल्या आणि स्वतःही पराभूत झालेल्या अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचं नेतृत्व करायला कुणीच पुढं यायला तयार नव्हतं. बुडत्या जहाजावरून उड्या टाकण्याची स्पर्धा जिथं सुरू होती, तिथं त्या जहाजाचा कप्तान व्हायला कुणीच तयार असणं शक्य नव्हतं. अशा प्रतिकूल परिस्थितीत बाळासाहेब थोरात यांच्याकडं प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं आली. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे आव्हान पेललं. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून अनेकदा त्यांनी प्रदेशाध्यक्षपदी अन्य कुणाची तरी वर्णी लावा, असं पक्षश्रेष्ठींना सांगून पाहिलं. महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आदी राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड एकाच वेळी करण्यात येणार होती; परंतु अन्य तीन ठिकाणी प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घेताना महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र तसा निर्णय झाला नव्हता. त्यामुळं बाळासाहेब थोरात यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला धोका नाही, असं वाटत होतं; परंतु अन्य कुणी काढून टाकण्याची किंवा प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी करण्याची वाट पाहणार्यातील बाळासाहेब नाहीत. त्यांना पदाचा मोह कधीच नव्हता. अतिशय संयमी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. गटबाजीनं जो पक्ष संपत चालला आहे, अशा पक्षात राहूनही ते कधीच गटबाजीला थारा देत नाहीत. पक्षहित हेच त्यांचं एकमेव ध्येय आणि धोरण असतं. पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध असल्यानं अन्य कुणी काय म्हणतं, याची चिंता करण्याची त्यांना गरज नसते, तरीही त्यांचं धोरण सर्वसमावेशक असतं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर ज्या पहिल्या चार जणांनी शपथ घेतली, त्यात काँग्रेसच्या फक्त बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता, यावरून त्यांचं पक्षातील स्थान लक्षात येतं. त्यांची जेव्हा प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लावण्यात आली, त्या वेळी अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठता येईल, की नाही, याबाबत संभ्रम होता. अशा वेळी पक्षाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यांनी राज्यभर दौरे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झंझावाताचा फायदा काँग्रेसच्या काही उमेदवारांना करून दिला. काँग्रेस हा गेल्या निवडणुकीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष राहिला, तरी त्याला अपेक्षेपेक्षा दुप्पट जागा मिळाल्या.
थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘आस्थे कदम’ का होईना प्रगती होत होती. त्यांना काँग्रेसच्या मर्यादा ठावूक होत्या. भाजपचं आव्हान पेलायचं असेल, तर तीन पक्षांना एकत्र यावं लागेल, धोरणं घ्यावी लागतील, हे त्यांना माहीत आहे. चौथ्या क्रमाकांच्या पक्षाला वाढायचं असेल, तर कुरघोडीचं राजकारण उपयोगाचं नाही, हे ही त्यांना ज्ञात आहे; परंतु एखादा पक्षात, सरकारमध्ये स्थिर व्हायला लागला, की त्याच्या खुर्चीखाली सुरुंग पेरायचा, ही काँग्रेसजणांची रीत आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत पुणे, नागपूरसारख्या कधी नव्हे, त्या मिळणार्या जागा जिंकल्यानंतरही थोरात यांच्याविरोधात कान भरणं सुरू झालं. नागपूरच्या जागी दिलेल्या उमेदवाराला तर पक्षातूनच विरोध होता. पक्षाचे प्रभारी के. एच. पाटील यांच्याकडं तशा तक्रारी करण्यात आल्या. एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सत्तेचा पुरेपूर फायदा उठविला असताना काँग्रेस मात्र त्यात कुठंही दिसत नव्हती. त्याचं कारण काँग्रेस गटबाजीत अडकली होती. परस्परांचे पाय ओढण्याची शर्यत सुरू होती. काँग्रेसच्या मंत्र्यांत समन्वय नव्हता. प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेताच घोषणा केल्या जात होत्या. थोरात हे जुळवून घेण्याच्या वृत्तीचे आहेत, तोडण्याच्या नाहीत; परंतु पक्षांतर्गत विरोधक मात्र त्याचंच भांडवल करायला लागले. थोरात पवार यांच्या आहारी गेले आहेत, अशी कानभरणी सुरू झाली. चांगले, सौहार्दपूर्ण संबंध असणं म्हणजे आहारी जाणं नव्हे; परंतु काँग्रेसजणांना ते कोण सांगणार? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागं काँग्रेसची फरफट होत आहे. त्याला एकटे थोरात जबाबदार नाहीत; परंतु अपयशाचं खापर थोरात यांच्या माथी फोडण्याची जणू अहमहमिका काँग्रेस जणांत लागली होती. विधिमंडळाचा गटनेता, प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री अशा तीनही पदांचा कारभार थोरात यांच्याकडं असताना त्यांनी कधीच कोणत्याही पदावर अन्याय होऊ दिला नाही; परंतु पदांच्या विकेंद्रीकरणाचा मुद्दा पुढं आला. थोरल्या आणि धाकट्या पातीचं अध्यक्षपद एकाच कुटुंबात असल्याकडं काँग्रेसमधील पक्षांतर्गत विरोधक लक्ष वेधून अप्रत्यक्षपणे थोरात यांनी ते पद सोडावं, असा दबाव आणीत होते. विरोधकांशी लढणं सोपं; परंतु पक्षांतर्गत विरोधकांशी दोन हात करणं किती अवघड असतं, हे थोरात यांना विखे यांच्यामुळं अनुभवाला आलं आहे. अजातशत्रू अशा त्यांच्या प्रतिमेला धोका निर्माण होत होता. तीन पदापैकी प्रदेशाध्यक्षपदामुळंच जास्त संघर्षाला सामोरं जावं लागतं. टीका सहन करावी लागते. ती टीकाच थोरात यांना सहन होत नव्हती. त्यामुळं कुणी काही सांगण्याअगोदर थोरात यांनी दिल्लीत जाऊन प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मोकळं करण्याचं साकडं स्वतःच घातलं. पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीत थोरात यांनी आपली भूमिका स्पष्ट केली; मात्र बाळासाहेब किंवा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून राजीनाम्याबद्दल अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. काँग्रेसच्या नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनी थोरात यांच्या राजीनाम्याचं वृत्त फेटाळलं; पण पक्षश्रेष्ठींनी योग्य तो निर्णय घ्यावा असं ते सांगू शकतात, अशी शक्यता प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्या ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. थोरात यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची इच्छा थोरात यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना कळवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काँग्रेसचा चेहरा बदललण्याची मागणी आडमार्गानं केली जात आहे. काँग्रेसची कमान युवा नेतृत्वाच्या हाती द्यावी अशी मागणी काही काँग्रेस नेत्यांनी केली आहे. थोरात काँग्रेसचे राज्यातील वरिष्ठ नेते आहेत. आठ वेळा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचणार्या थोरात यांचा अनुभव दांडगा आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापनेत थोरात यांचीही महत्त्वाची भूमिका होती. थोरात यांना बदलून कुणीही नेता आणला, तरी त्याला प्राप्त परिस्थितीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यांशी जुळवून घ्यावं लागेल; परंतु या वास्तवाचं भान काँग्रेसजणांना नाही. हे भान ठेवलं नाही, तर काँग्रेसची अवस्था आणखी वाईट होईल. सरकार टिकलं नाही, तर पुढच्या वेळी दहाही जागाही निवडून येणार नाहीत. थोरात यांच्या जागी राजीव सातव, महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि विदर्भातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. असं असलं, तरी पवार-ठाकरे यांच्यांशी वाटाघाटीत शरण न जाणारं नेतृत्व म्हणून पृथ्वीराज चव्हाण. राजीव सातव यांच्याकडं प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं जाण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील थोरात यांच्याकडं महसूलमंत्रिपद, विदर्भाकडं विधान परिषदेचं अध्यक्षपद अशी पदं दिल्यानं मराठवाड्याकडं प्रदेशाध्यक्षपद देऊन सत्तेचा समतोल साधण्यावर काँग्रेसचा भर असेल. थोरात यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असताना निवडणुकीतील प्रचारादरम्यान पक्षाची धुरासुद्धा पूर्णपणे त्यांच्याच हातात होती. अनेक मोठे नेते पक्ष सोडून जात असताना त्यांनी डॅमेज कंट्रोलचं काम बर्यापैकी पार पाडलं. परिणामी मागच्या वेळच्या आकड्यामध्ये दोनची भर पडून एकूण 44 जागा निवडून आल्या. राहुल आणि सोनिया यांच्या विश्वासातील असलेल्या थोरात यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का, हा खरा प्रश्न आहे.