राहुरी : उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ...
राहुरी : उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पाचं अजित पवारांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत कुठे मिश्किल भाष्य करत हास्याचे चौफेर कारंजे उडवले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरे यांचे नात्याने मामा आहेत, त्यावरही अजित पवारांनी मिश्किल भाष्य केले. मामाची विकास निधीसाठी मदत घ्या, नाही तर माझाच मामा व्हायचा, असं म्हणत अजित पवार हसले. महाविकास आघाडीचे जे जे नेते येतील त्यांना प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात दहा, अहमदनगरमधून राष्ट्रवादीचे सहा आमदार निवडून आले. सातवे शंकरराव गडाखही आले, आघाडीतले बाळासाहेब थोरात आले. आशुतोष काळे हा तरुण सहकारी आला, रोहित पवारला कर्जत जामखेडच्या जनतेने आशीर्वाद दिला. संग्राम जगताप दुसऱ्यांदा निवडून आला. शंकरराव सिनिअर आहेत, तेही दुसऱ्यांदा आले. बाळासाहेब थोरात तर 1985 पासून विधानसभेवर आहेत. त्यांची सातवी-आठवी टर्म आहे” असं अजित पवार सांगत आहेत.
वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय
“प्राजक्त तनपुरेंना नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास अशा पाच-सहा मंत्रालयांचं राज्यमंत्रिपद मिळालं. मलाही राज्यमंत्रिपद दिलं होतं, मी पहिल्यांदा निवडून आलो तेव्हा. पण मला कृषी, फलोत्पादन आणि ऊर्जा अशी तीनच खाती होती आणि या पठ्ठ्याला बघा… वाढपी तुमचाच आहे, पंगत जेवायला बसलीय, राहुरीला जास्त मिळणार यात शंकाच नाही. पण वाढपी कशामुळे निवडून आला, तर कोपरगाव, संगमनेर, राहुरी, अहमदनगर अशा सगळ्या मतदारसंघांमुळे. प्राजक्ता, इथेही लक्ष दे रे बाबा, माझ्या बारामतीकडे नंतर लक्ष दिलंस तरी चालेल. पण सगळ्यांना वाटलं पाहिजे, राहुरीसारखं आमच्याकडेही लक्ष देतोय” असं अजित पवार हसत म्हणाले.