मुंबई /प्रतिनिधी : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. वर्षा यांना 11 ज...
मुंबई /प्रतिनिधी : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. वर्षा यांना 11 जानेवारी रोजी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी चार जानेवारी रोजी वर्षा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. या वेळी ईडी अधिकार्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी केली होती. राऊत यांची 55 लाख रुपयांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीला चौकशी करायची आहे. वर्षा राऊत यांनी पीएमसी बँक खात्यामधून आर्थिक व्यवहार केले होते. ईडीने त्यांना नोटीस पाठवून 29 डिसेंबर रोजी चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्याने निर्देश दिले होते. पत्नीला ईडीची नोटीस मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट केले. कोणाचेही नाव न घेता त्यांनी लिहिले होते, की,आ देखें जरा किसमें कितना है दम, जमकर रखना कदम मेरे साथिया तसेच ’पुराव्यानिशी आरोप सिद्ध करा, नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास तयार राहा. समझनेवाले को इशारा काफी है’.
ईडीने वर्षा यांना 11 डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती. त्या वेळी त्या हजर राहिल्या नाहीत. त्यानंतर 29 डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाने दिले होते; परंतु वर्षा यांनी 28 डिसेंबरला ईडीला पत्र लिहून चौकशीला हजर राहण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना पाच जानेवारीला हजर राहायचे होते; परंतु त्या एक दिवस आधीच म्हणजेच चार जानेवारीला दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाल्या. पीएमसी बँकेत बनावट खात्यांद्वारे एका विकासकाला शेकडो कोटी रुपये कर्ज दिल्याची बाब 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली होती. ही प्रक्रिया पूर्ण होऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2019 मध्ये निर्बंध घातले होते. हे निर्बंध मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आले आहेत.
पीएमसी बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने सारंग आणि राकेश वाधवान यांना अटक केली. पीएमसी बँकला बुडवण्यात जी 44 मुख्य खाती होती, त्यापैकी 10 खाती एचडीआयएलची होती. दुसरीकडे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनाही ईडीकडून समन्स बजावण्यात आला होता. त्यांना चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु तब्येतीच्या कारणात्सव प्रताप सरनाईक आज चौकशीला हजर राहिले नाहीत. आपण आज गैरहजर राहणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी वकिलामार्फत ईडीला कळवले.