राजकीय पक्षांचा एक भ्रम असा आहे, की आपल्या पक्षाचा नेता आक्रमक असला, तरच पक्षाची वाढ होते. तसे काहीही नसते. संयमी नेत्यांमुळे ही पक्ष वाढतो....
राजकीय पक्षांचा एक भ्रम असा आहे, की आपल्या पक्षाचा नेता आक्रमक असला, तरच पक्षाची वाढ होते. तसे काहीही नसते. संयमी नेत्यांमुळे ही पक्ष वाढतो. आर. आर. पाटील, शरद पवार, जयंत पाटील, उद्धव ठाकरे आदी नेत्यांनी कर्तत्वाने ते दाखवून दिले आहे. महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे यांनीही प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला नेतृत्व दिले आहे. बाळासाहेब थोरात हे ही संयमी नेते आहेत. त्यांचे नाव सातत्याने सीएम इन वेटिंग असे घेतले जात होते; परंतु अंतर्गत लाथाळ्यामुळे काँग्रेसची अवस्था किती वाईट झाली हे वेगळे सांगायला नको.
एक पद, एक व्यक्ती हे तत्व काँग्रेसमध्ये लागू केले असले, तरी अनेकदा ते बाजूला ठेवावे लागते. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची वाताहात झाली. त्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व कारायला कुणीही तयार नव्हते. सोनिया व राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांत मोडले जाणारे, संयमी नेते म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या बाळासाहेबांवर काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली. अतिशय संयमाने त्यांनी बुडत्या जहाजाला वाचविले. काँग्रेसला दहा-बाराही जागा मिळतील, की नाही, अशी साशंकता होती. तिथे थोरात यांनी काँग्रेसला 44 जागा मिळवून दिल्या. गटबाजीत न पडणार्या आणि सर्वांशी जुळवून घेणार्या बाळासाहेबांचा हा स्वभाव काँग्रेसमधील अनेकांना खुपणारा होता. नको तिथे संघर्ष करण्यात काहीही अर्थ नाही, हे बाळासाहेबांना पटते; परंतु आयुष्यभर परस्परांची जाजमे खेचणार्या, तंगड्या ओढणार्या अन्य काँग्रेसजणांना ते पटत नाही. राज्यात तीन पक्षांचे सरकार असून ते टिकवण्याची जबाबदारी तीनही पक्षांची आहे; परंतु काँग्रेसजणांना मात्र शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमागे आपली फरफट होत आहे आणि त्याला कारण बाळासाहेबांचा संयमी स्वभाव कारण आहे, अशी या सर्वांची तक्रार आहे. त्यामुळे हे नेते वारंवार पक्षश्रेष्ठींकडे बाळासाहेबांबाबत तक्रारी करत असतात. त्यामुळे कधी कधी बाळासाहेबांनाही आपल्या स्वभावाला मुरड घालून अचानक आक्रमकपणा घ्यावा लागतो. पक्षांतील अंतर्गत लाथाळ्यांमुळेच तर बाळासाहेबांना स्वतःच प्रदेशाध्यक्षपद नको आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ते सातत्याने आपल्याला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा, असा आग्रह धरीत आहेत. पक्षाला तरुण चेहरा द्या, असा त्यांचा आग्रह आहे. सोनिया गांधी यांनी मध्यंतरी थोरात यांना आश्वस्त केले होते; परंतु प्रत्यक्षात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षपद म्हणजे आक्रस्ताळेपणा नव्हे. पक्षाला संयतपणे दिशा देता येते; परंतु अलिकडे पद मिळाले, की आक्रमकपणा दाखविल्याशिवाय पक्षात आपली ओळख होणार नाही, असे अनेकांना वाटत असते. काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचा अंदाज घेण्यासाठी जेव्हा पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील महाराष्ट्रात आले होते, तेव्हा बहुतांश आमदार आणि मंत्र्यांनी थोरात यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपद ठेवावे, अशी मागणी केली होती; परंतु पक्षाला प्रदेशाध्यक्ष बदलाची घाई झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, खासदार राजीव सातव, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांची नावे त्यात आघाडीवर होती. पटोले हे खरेतर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला हे पद मानवत नव्हते. काँग्रेसला आक्रमक चेहरा हवा आहे. अर्थात असा आक्रमक चेहरा दिल्याने काँग्रेसला फार फायदा होईल, असे वाटत असेल तर तो या पक्षाचा भ्रम ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. त्याचे कारण नेता केवळ आक्रमक असून चालत नाही, तर त्याचे अन्य पक्षांतही चांगले संबंध असावे लागतात. प्रदेशाध्यक्ष असले, तरी त्यांना पक्ष वाढविण्याबरोबरच सरकार टिकण्याचीही जबाबदारी घ्यावी लागते. पक्षाला आक्रमक चेहरा बनविताना सरकारला धक्का बसणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल. पटोले यांच्या खांद्यावर पक्ष नवी जबाबदारी देणार आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा भार कमी करुन त्यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची नवी जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार आहे. तसे संकेत गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळत आहेत. दस्तुरखुद्द पटोले यांच्या बोलण्यातूनही त्यांच्या गळ्यातच अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याचे दिसत आहे. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत बदल हे चालतच राहतात. मला जर संधी मिळाली, तर वेगळ्या भूमिकेत मी पुढे जाईन आणि तुमच्याकडे येईनही, असे सूचक भाष्य करताना राज्यात स्वबळावर सत्ता कशी स्थापन करता येईल, यासदंर्भात काम करीन तसेच महाराष्ट्राला पुनः वैभव प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेस काम करणार असल्याचे पटोले यांनी सांगितले.
त्यादृष्टीने पटोले कामालाही लागले आहेत. पटोले यांची आक्रमक नेते म्हणून आहे, त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमीच आक्रमक अंदाज दिसून येतो. प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार घेण्याअगोदरच त्यांनी आक्रमक होत राज्यात स्वबळावर सत्ता कशी स्थापन करता येईल, यासदंर्भात काम करीन, असे म्हणत नव्या राजकीय दिशेचे संकेत दिले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष राज्याच्या सरकारमध्ये आहे. प्रत्येक पक्षाला आपले अवकाश वाढविण्याचा अधिकार आहे; परंतु ते करताना भाजपऐवजी मित्रपक्षांचेच अवकाश व्यापणार नाही ना, हे पाहावे लागेल. ते पाहिले नाही, तर सरकारच्या अस्तित्त्वाला धोका होईल.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मिळून काँग्रेसला डावलत असल्याची चर्चा आहे. आगामी काळात हे तिन्ही पक्ष एकत्र मिळून विविध महापालिकांच्या निवडणुका लढवण्याची शक्यताही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर तडजोड करण्यासाठी तितकाच तोलामोलाचा नेता असावा म्हणून काँग्रेसकडून अनुभवी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सुनील केदार, वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांची नावे मागे पडून पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून प्राधान्य देण्यात आल्याची चर्चा आहे. इकडे बदलाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे थोरात यांना बदलू नये, अशी मागणी केली जात आहे. थोरातच प्रदेशाध्यक्ष पदावर राहिले पाहिजे. पुढच्या वेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. ठाकूर स्वतः ही प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आणि राज्याचे सहप्रभारी आशिष दुवा आणि बी. एम. संदीप यांच्यासमोर ठाकूर यांनी हे वक्तव्य केले असल्याने त्याला महत्त्व आहे. प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी नवीन पदाची सूत्रे हाती घेतली. हा पदग्रहण सोहळा थोरात यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला. त्या वेळी ठाकूर यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्षातील महिलांनी एकत्र येऊन थोरात यांची ताकद वाढवायला हवी, असे सव्वालाखे यांनी सांगितले. गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसच्या 12 ते 13 जागा येतील, असे बोलले जात होते. तेव्हा कोणी प्रदेशाध्यक्ष व्हायला तयार नव्हते. पक्ष सत्तेत नसतानाच्या काळात पक्ष संघटनेच्या वाढीसाठी प्रत्येकाला बरोबर घेऊन चालणे, त्यांच्यामागे ताकदीनिशी उभे राहण्याचे काम थोरात यांनी केले आहे. त्यामुळे आणि पक्षातील सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेसच्या विधानसभेत 44 जागा निवडून आल्या आहेत. यामुळे थोरात प्रदेशाध्यक्ष राहिलेच पाहिजे, पुढच्यावेळी सरकार बनवल्याशिवाय राहणार नाही, असेही त्या म्हणाल्या. त्यावरून आता पक्षात पुन्हा लाथाळ्या सुरू होण्याची शक्यता आहे.