सलग सुट्ट्या असल्याने घराकडे जाणार्या चाकरमान्यांची गर्दी खंडाळा / प्रतिनिधी : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात पाचव्या वळणावर सहा ...
सलग सुट्ट्या असल्याने घराकडे जाणार्या चाकरमान्यांची गर्दी
खंडाळा / प्रतिनिधी : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात पाचव्या वळणावर सहा ते सात सीएनजी कार अचानक बंद पडल्याने घाट रस्ता सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बंद पडला आहे. शनिवार व रविवार सलग सुट्ट्या असल्याने या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते. त्यामुळे खंबाटकी घाटाच्या पायथ्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टीचे व सोमवार एक दिवस वर्कींग डे असल्याने रजा टाकून गावाकडे जाणार्यांची संख्या वाढली आहे. त्याचाच प्रत्यय पुण्याहून-साताराकडे जात असताना घाटमाथ्यावर दत्तमंदिर व खामजाई मंदिर परिसरात चार पदरीचे काम रखडल्याने येथे सिंगल लेन सुरु होते. यामुळे येथे वाहने बंद पडून अनेक वेळा घाट जाम होतो. तसेच याही वेळी येथे वाहने बंद पडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. दरम्यान, घटनास्थळी तत्काळ खंडाळा पोलिस ठाण्याचे विठ्ठल पवार हे दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
पुणे-सातारा मार्गावर खंबाटकी घाटात अचानक वाहतूक कोंडी झाल्याने अनेकांची तारांबळ झाली. दरम्यान, सकाळी साडेदहा वाजता कोंडी झालेली वाहतूक कॅनॉल मार्गे बोगद्याकडे वळवण्यात आली, तर बोगद्यामार्गे वाहतूक सोडल्यानंतर सातारा ते पुण्याकडे येणार्या वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. सकाळी साडेअकराच्या दरम्यान एक पोलीस व दोन होमगार्ड एवढाच स्टाफ वाहतूक नियंत्रणासाठी असल्याने पोलिसांचे वाहतुकीवरील नियंत्रण राहिले नाही. वाहतूक खोळंबल्याच्या घटनेनंतर तब्बल दोन तासाने खंडाळ्याचे अधिक पोलीस कर्मचारी घाटात रवाना झाले. सायंकाळच्या दरम्यान उशिरा वाहतूक सुरळीत करण्यात यश आले. वाहनांची गर्दी वाढल्याने घाटातील वाहतूक धिम्या गतीने सुरु ठेवण्यात आली आहे.