चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती; संपादकीयातील भाषा आक्षेपार्ह पुणे : शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे...
चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती; संपादकीयातील भाषा आक्षेपार्ह
पुणे : शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. त्यामुळे संपादक रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार आहे, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिसीविषयी लिहिताना अग्रलेखात आपल्याविषयी वापरलेली भाषा अशोभनीय असल्याची तक्रार चंद्रकांतदादांनी केली आहे. ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य’ अशा शब्दात चंद्रकांतदादांवर बोचरी टीका करण्यात आली होती.
शिवसेनेच्या मुखपत्रात माझ्याविरोधात गलिच्छ भाषेत लिखाण केले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस होती, त्या वेळी त्यांची भाषा शोभनीय नव्हती. मिसेस मुख्यमंत्री रश्मी ठाकरे शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादक आहेत. संपादक म्हणून ही त्यांची भाषा असू शकत नाही. मग, अग्रलेखात ती कशी? त्यामुळे त्यांना मी पत्र लिहिणार आहे असे चंद्रकांतदादांनी सांगितले.
‘ईडी’ च्या बाबतीत ज्यांना ‘घटना’ आठवते त्यांनी राज्यपालनियुक्त जागांबाबतही घटनेचे स्मरण ठेवले पाहिजे, असा टोला अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना लगावण्यात आला होता. ‘ईडी’ वगैरेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडता येईल, या अंधश्रद्धेतून आता बाहेर पडले पाहिजे, अस राऊत यांंनी म्हटले. ‘चंद्रकांत पाटलांना घटनेची इतकी फिकीर कधीपासून लागून राहिली? तुम्हाला घटना मान्य नाही काय, हा प्रश्न त्यांनी राजभवनाच्या दारात उभे राहून जोरात विचारायला हवा. घटनेची सगळ्यात जास्त पायमल्ली सध्या कुठे होत असेल तर ती घटनेच्या तथाकथित रखवालदाराकडून. मागच्या जून महिन्यात राज्यपालनियुक्त 12 जागा रिकाम्या झाल्या. त्या जागांची शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळाने केली. राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारशी मान्य करणे हे राज्यपालांना बंधनकारक असल्याचे आपली घटनाच सांगते. मग, इतके महिने उलटून गेले, तरी राज्यपालनियुक्त जागा रिकाम्या का ठेवल्या?, असा सवालही राऊत यांनी विचारला होता.