विधानसभेच्या निवडणुका असलेल्या राज्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने पराभवाला तोंड द्यावे लागलेली ...
विधानसभेच्या निवडणुका असलेल्या राज्यांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीपासून सातत्याने पराभवाला तोंड द्यावे लागलेली काँग्रेस आता भाजपच्या वाटेने जात आहे. काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांना आगामी काळातील निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. 2021 मध्ये निवडणुका असलेल्या राज्यांची जबाबदारी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आली आहे. यंदा केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि आसामची निवडणूक होणार आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह मुकूल वासनिक, एम वीरप्पा मोईली, एमएम पल्लम राजू, लुईजिन्हो फलेरियो, डॉ. नितीन राऊत, बी. के. हरिप्रसाद, विजय इंदर सिंगला यांच्यासह इतर नेत्यांना आगामी निवडणुकांच्या पर्यवेक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेहलोत यांच्याकडे केरळ राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत लुइजिन्हो फ्लोरियो आणि जी. परमेश्वर हेदेखील केरळची जबाबदारी सांभाळतील. केरळमध्ये काँग्रेस विरोधी पक्ष आहे. येथे काँग्रेसला डाव्या पक्षांचे आव्हान आहे.
बघेल यांच्यावर आसामाची जबाबदारी देण्यात आली आहे. बघेल यांच्या जोडीला मुकूल वासनिक आणि शकील अहमद असणार आहेत. आसाममध्ये काँग्रेसपुढे भाजपचे आव्हान आहे. गेली पाच वर्षे आसाममध्ये भाजप सत्तेत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये दोन टर्म मुख्यमंत्रिपद भूषवत आहेत. भाजपने तिथे मिशन पश्चिम बंगाल सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालची जबाबदारी हरिप्रसाद, आलमगीकर आलम आणि विजय इंदर सिंगला यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये सध्या जयललिता यांच्या अण्णा द्रमुक यांच्या पक्षाची सत्ता आहे. काँग्रेसची या राज्यामध्ये द्रमुकसोबत युती आहे. तामिळनाडूच्या राजकारणातील दोन मोठे नेते जयललिता आणि करुणानिधी यांचे निधन झाल्यामुळे अण्णा द्रमुक आणि द्रमुक यांची धुरा त्यांच्या राजकीय वारसदारांकडे आलेली आहे. तामिळनाडूच्या पर्यवेक्षकपदी महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, एम. वीरप्पा मोईली, एमएम पल्लम राजू यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपच्या पुढे आणखी एक पाऊल
राज्यांच्या निवडणुका असल्यातर भाजप त्यांच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी मैदानात उतरवते. काँग्रेसने तर भाजपच्या पुढचे पाऊल टाकत निवडणुकांच्या पर्यवेक्षकपदांची जबाबदारी सोपवली आहे. राऊत यांच्यावर केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. त्यांच्याकडे तामिळनाडू आणि पाँडिचेरीची जबाबदारी देण्यात आली. वासनिक यांच्यावर आसामची जबाबदारी देण्यात आली आहे.