लोणंद / वार्ताहर : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी परिसरातील कापरेवस्ती व शिंदेवस्ती या ठिकाणी कोंबड्या मृत झाल्याने परिसरातून एक भीती व्यक्त...
लोणंद / वार्ताहर : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी परिसरातील कापरेवस्ती व शिंदेवस्ती या ठिकाणी कोंबड्या मृत झाल्याने परिसरातून एक भीती व्यक्त केली जाते आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबत विशेष दखल घेत खबरदारीचा उपाय म्हणून आदेश ही जारी केले आहेत. मरिआईचीवाडी कापरे वस्ती या ठिकाणी सुरेश हणमंत कापरे यांनी पाळलेल्या 100 कोंबड्या पैकी 8 कोंबड्या शिल्लक राहिलेल्या आहेत. तसेच शिंदेवस्ती या ठिकाणी कमी प्रमाणातच कोंबड्या मृत झालेल्या आहेत. कापरे वस्तीवरील शिल्लक असलेल्या कोंबड्या ही मृत होतील अशीच परिस्थिती असल्याचे सुरेश कापरे यांनी म्हटले आहे
याबाबतची अधिक माहिती त्यांनी अशी सांगितलेली आहे की, मंगळवारी सकाळी 4 ते 5 कोंबड्या मृत झाल्या होत्या. तसेच बुधवारी संध्याकाळी सर्वात जास्त कोंबड्या मृत झाल्या होत्या. डॉ. सूर्यवंशी यांच्याकडे कोंबड्याचे पोस्ट मोर्टम करण्यास ही नेहण्यात आल्या होत्या. मानवी वसाहतीस कोणताही धोका होऊ नये. म्हणून मृत झालेल्या कोंबड्या इतरत्र फेकून न देता त्या कोंबड्या जमिनीत पुरून टाकण्यात आलेल्या आहेत. शिवाय घटना स्थळावर सातारा जिल्ह्याचे उपायुक्त परिहार, यांच्यासह खंडाळा तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन काकडे, लोणंदचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर मुळे यांनी भेट देत आढावा घेतला.
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन काकडे यांनी संबधित कोंबड्याबाबतच्या मृत्यूचे कारण निदानाबाबत पुढील कार्यवाहीसाठी नमुने हे पुणे येथे पाठविण्यात आल्याचे म्हटलेले आहे. दि. 16 जानेवारी रोजी या बाबतचा अधिक अहवाल समजेल असे ही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रकारामुळे भीती असून जे कोंबड्यांचा सांभाळ करत पोल्ट्री फार्मचा व्यवसाय करत आहेत. अशा लोकांना ही आपल्याला आर्थिक तोटा होणार तर नाही ना याबाबतची चिंता ही वाटते आहे. शिवाय सुरेश कापरे यांनी असे म्हटलेले आहे की, शेतीसोबत हा जोडधंदा होता. हे आमच्या साठी एक उपजीविकेचे साधन होते. या कोंबड्यांकडून रोज 25 ते 30 अंडीचे उत्पादन होत असताना साधारण 60 हजाराच्या पुढे नुकसान झाले आहे. त्यामुळे याबाबत प्रशासनाकडून दखल घेत मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त कऱण्यात आली आहे. ज्या कोंबड्या मृत झालेल्या होत्या. त्यातील काही निवडक नमुने हे विभागीय प्रयोगशाळा औंध पुणे येथे तपासणीसाठी पाठविलेले आहेत. त्याचे निदान झाल्यावर आपल्याला कळेल की नक्की कशाने कोंबड्या मेल्या आहेत. या कोंबड्याच्या परिसरात सोडियम हायपोक्लोराईड सोल्यूशन फवारून घेतलेले आहे. जैव सुरक्षेचे जे नियम असतात. त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत.