सातारा / प्रतिनिधी : आनेवाडी टोलनाक्यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज (सोमवार...
सातारा / प्रतिनिधी : आनेवाडी टोलनाक्यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज (सोमवार) निर्दोष मुक्तता केली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची दुरवस्था झालेली असताना, तसेच आवश्यक सेवासुविधा मिळत नसतानाही आनेवाडी टोलनाक्यावर टोल वसुली होत असल्याने महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या विरोधात शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी 18 डिसेंबर 2019 रोजी आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते.
त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी नाक्यावरील टोल वसुली बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. टोल नाक्यावर बसून विरोधी घोषणा देत निदर्शने करण्यात आली होती. या वेळी जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून पोलीस कर्मचारी धनाजी तानाजी कदम यांनी सर्व आंदोलकांच्या विरोधात भुईंज, ता. वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. खटल्याच्या सुनावणी नुकतीच झाली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. एन. गिरवलकर यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांची सोमवार, दि. 11 रोजी निर्दोष मुक्तता केली. आ. शिवेंद्रसिंहराजे व इतरांच्या वतीने शिवराज धनवडे, आर. डी. साळुंखे, संग्राम मुंढेकर, प्रसाद जोशी यांनी तर सरकार पक्षाच्या वतीने मिलिंद पांडकर यांनी काम पाहिले.